Join us  

केंद्र सरकारची लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ; आता किती मिळणार पगार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 1:38 PM

DA Increase Salary : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वीच देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी ही भेट मानली जात आहे.

DA Increase Salary : दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी डीए जारी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असला तरी, केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही डीए वाढीची घोषणा केली जाईल. डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांची थकबाकी देण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.

केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवते. या वर्षी म्हणजेच २०२४ मध्येही जानेवारीत ४ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता, तर आज झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळेच जुलैपासून महागाई भत्त्यातील ही ३ टक्के वाढ लागू होणार आहे. या दृष्टीकोनातून पाहिल्यास जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

पगार किती वाढणार?कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगाराच्या आधारे ठरवला जातो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४० हजार रुपये असेल आणि त्याचा DA ३ टक्क्यांनी वाढला तर त्याच्या पगारात १,२०० रुपयांची वाढ होईल. अशाप्रकारे, जर मूळ वेतन, महागाई भत्ता आणि निवास भत्ता म्हणजेच HRA जोडून त्याचा पगार ६० हजार रुपये होता, तर आता तो ६०,१२०० रुपये होईल.

किती थकबाकी मिळणार?४० हजार रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला ३ टक्के डीए वाढीसह दरमहा १,२०० रुपये अतिरिक्त महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होईल. ही वाढ जुलैपासूनच लागू मानली जात असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. अशाप्रकारे त्यांना थकबाकी म्हणून ३,६०० रुपयेही मिळतील.

ऑक्टोबरमध्ये किती पगार येईल?डीएची वाढ जुलैपासूनच लागू केली असल्याने ऑक्टोबरसह एकूण ४ महिन्यांची थकबाकी होईल. अशाप्रकारे ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांना आतापर्यंत मिळणाऱ्या एकूण पगारातून सुमारे ४८०० रुपयांची वाढ मिळणार आहे. मूळ पगार ४० हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये ४ महिन्यांचा डीए मिळाला तर त्यांच्या खात्यात एकूण पगार ६४,८०० रुपये होईल.

टॅग्स :सरकारनोकरीमहागाई