नाशिक : राज्यातील शिवसेना-भाजपा युती तुटल्यामुळे त्याचा थेट परिणाम येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणार्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीवर होणार असून, राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष साथ देणारी शिवसेना प्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या अथवा कॉँग्रेसच्या सोबत जाऊ शकते.
विशेष म्हणजे, संख्याबळ चारवरून पाचवर गेलेल्या भाजपाचा मात्र दुर्दैवाने या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांना विरोधातच बसावे लागण्याची शक्यता आहे. नुकत्याच २१ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाचे सदस्य निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी झालेले नव्हते; मात्र शिवसेनेने तटस्थ राहून कॉँग्रेसची गोची करीत राष्ट्रवादीला मदतच केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. आता येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणार्या विषय समिती सभापती निवडणुकीत चार सभापतिपदांसाठंी निवडणूक होणार असून, राष्ट्रवादीचे सर्वाधिक २७ व तीन अपक्ष धरून ३० संख्याबळ असून, त्यांना शिवसेनेने साथ दिल्यास शिवसेनेचे २० सदस्य मिळून शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आल्यास चक्क ५० चा बहुमताचा आकडा हे दोन्ही पक्ष गाठू शकतात. याउलट शिवसेना-भाजपा एकत्र येऊन त्यांना कॉँग्रेसने साथ दिल्यास हाच आकडा ३९ च्या घरात म्हणजेच बहुमताच्या घरात जाऊ शकतो. शिवसेनेचे २०, भाजपाचे पाच व कॉँग्रेसचे १४ सदस्य आहेत. त्यामुळे आगामी विषय समिती सभापतिपदांची निवडणूक युतीचा काडीमोड झाल्याने चांगलीच रंगात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी आपापल्या परीने हालचाली सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)
इन्फो..
हे आहेत इच्छुक
सभापतिपदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शैलेश सूर्यवंशी, यतिन पगार, बाळासाहेब गुंड, गोरख बोडके, इंदुमती खोसकर, प्रवीण गायकवाड हे इच्छुक असून, कॉँग्रेसकडून प्रा. अनिल पाटील, सोमनाथ फडोळ, केरू पवार, डॉ. प्रशांत सोनवणे, ॲड. संदीप गुळवे, निर्मला गिते इच्छुक आहेत. तसेच शिवसेनेकडून प्रवीण जाधव, बंडू गांगुर्डे, चंद्रकांत वाघ आदि, तर भाजपाकडून केदा अहेर, मनीषा बोडके इच्छुक आहेत. आता काडीमोड झाल्यानंतर कोणाची कोणाशी युती आणि आघाडी होते, यावरच सभापतिपदांचे गणित अवलंबून आहे.
काडीमोडचा परिणाम होणार सभापती निवडीवर
नाशिक : राज्यातील शिवसेना-भाजपा युती तुटल्यामुळे त्याचा थेट परिणाम येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणार्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीवर होणार असून, राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष साथ देणारी शिवसेना प्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या अथवा कॉँग्रेसच्या सोबत जाऊ शकते.
By admin | Published: September 25, 2014 11:03 PM2014-09-25T23:03:09+5:302014-09-26T00:11:28+5:30