कॉफी डे ग्लोबल (Coffee Day Global) आणि इंडसइंड बँक (IndusInd Bank)यांच्यात दिवाळखोरीच्या प्रकरणावर सामंजस्यानं तोडगा काढण्यात आलाय. या दोघांनी १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाला (एनसीएलएटी) ही माहिती दिली. आपल्यात सामंजस्यानं तोडगा काढण्यात आला असून दोन्ही पक्षांनी दिवाळखोरीचा खटला मागे घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही माहिती मिळाल्यानंतर, एनसीएलटीनं कॉफी डे ग्लोबलच्या दिवाळखोरीशी संबंधित आदेश स्थगित केला. ज्येष्ठ वकील अरविंद पांडियन आणि पवन झबक यांनी या प्रकरणी एनसीएलएटीला माहिती दिली.
आता कॉफी डे ग्लोबल आणि इंडसइंड बँक यांच्यातील प्रकरण सामंजस्यानं मिटवण्यात आल्याच्या बातमीमुळे कंपनीच्या शेअरनं वेग पकडलाय. बुधवारी इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये कॉफी डेच्या शेअरच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर २० टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह ५१.३६ रुपयांवर पोहोचला.
गेल्या एका वर्षात हा शेअर २५ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत यात मोठी वाढ झाली होती. गेल्या सहा महिन्यांत स्टॉक ४८ टक्क्यांहून अधिक वाढला. या शेअरनं १४ सप्टेंबर २०२२ रोजी ₹७३.५० चा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला आणि बीएसईवर २८ मार्च २०२३ रोजी ₹२६.४० या ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तराला स्पर्श केला.
कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड कॅफे कॉफी डे (CCD) ब्रँड अंतर्गत कॅफे चेन आउटलेटचं मॅनेजमेंट करते. कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
अंतरिम स्थगिती
दरम्यान, दिवाळखोरीवर स्थगितीचा हा आदेश केवळ अंतरिम आहे. हा आदेश देताना एनसीएलएटीनं काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण आवश्यक असल्याचं म्हटलं. त्यांनी इंडसइंड बँकेला यासंदर्भात दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)