Join us

केयर्नची मागणी ५.६ अब्ज डॉलरची

By admin | Published: July 13, 2016 2:38 AM

तेल संशोधन आणि उत्खनन क्षेत्रातील ब्रिटिश कंपनी केयर्न एनर्जीने मागील तारखेने कर लावल्याच्या प्रकरणात भारताकडे तब्बल ५.६ अब्ज डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे

नवी दिल्ली : तेल संशोधन आणि उत्खनन क्षेत्रातील ब्रिटिश कंपनी केयर्न एनर्जीने मागील तारखेने कर लावल्याच्या प्रकरणात भारताकडे तब्बल ५.६ अब्ज डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे. भारत सरकारने या कंपनीला मागील तारखेने कर लावून २९,0४७ कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यावर कंपनीने हा भरपाईचा दावा केला आहे. हे प्रकरण १0 वर्षे जुने आहे. एडिनबर्गच्या या कंपनीने भारत सरकारविरुद्ध एका आंतरराष्ट्रीय लवादासमोर दावा दाखल केला आहे. भारत सरकारच्या कर विभागाने दिलेली नोटीस मागे घेण्यात यावी, असे कंपनीने या दाव्यात म्हटले आहे. १६0 पानी खटल्यात कंपनीने म्हटले आहे की, ब्रिटनसोबत भारत सरकारने गुंतवणूक संरक्षण करार केलेला आहे. त्यानुसार, विदेशी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याची हमी या करारान्वये देण्यात आली आहे. तथापि, या कराराचे पालन करण्यास भारत सरकार अपयशी ठरले आहे.आंतरराष्ट्रीय लवादासमोर दाखल केलेल्या याचिकेत कंपनीने म्हटले की, लवादाने भारतास कर नोटीस मागे घेण्याचे आदेश द्यावेत. असे आदेश दिले जाऊ शकत नसतील, तर त्यामुळे कंपनीचे उरलेले समभाग घसरून जे नुकसान होणार आहे, त्यापोटी कंपनीला भारताकडून ५.५८७ अब्ज डॉलरची (३७,४00 कोटी) भरपाई मिळवून द्यावी. केयर्नने मागितलेली भरपाईची रक्कम कंपनीची ९.८ टक्के हिस्सेदारी आणि भारत सरकारने करापोटी मागितलेल्या रकमेच्या बरोबर आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)