नवी दिल्ली : कॉल ड्रॉपप्रकरणी भरपाई देण्याबाबत टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या मागण्या ट्रायने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे कॉल ड्रॉप झाल्यानंतर या टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना हा मोठाच फटका आहे.
कॉल ड्रॉपच्या मुद्यावर विचार करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांच्या सीईओची ट्रायसोबत आज बैठक झाली. या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नही. कॉल ड्रॉपबाबत ट्रायने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कॉल ड्रॉप ड्राईव्ह टेस्टमध्ये ट्राय बदल करू शकतो. कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकाला भरपाई देण्यास ट्रायने कंपन्यांना सांगितले आहे. जानेवारीपासून हे नियम लागू केले जाणार आहेत. कॉल ड्रॉप झाल्यास टेलिकॉम कंपन्यांना प्रत्येक कॉलमागे तीन रुपये भरपाई द्यावी लागेल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.
कॉल ड्रॉप झाल्यास देण्यात यावयाच्या भरपाईपोटी आपल्यावर वर्षाला २ हजार कोटी ते ५० हजार कोटी रुपये ओझे पडेल, असा युक्तिवाद टेलिकॉम कंपन्यांतर्फे करण्यात आला होता. असे झाल्यास दरात वाढ करण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय उरणार नाही, असेही या कंपन्यांनी म्हटले होते. आता आपण दोन आठवड्यांपर्यंत ट्रायच्या उत्तराची प्रतीक्षा करणार आहोत. त्यात ट्राय आपले धोरण बदलते की नाही, हे पाहिले जाईल. जर तसे झाले नाही तर टेलिकॉम कंपन्या दर वाढविण्यास मजबूर होतील किंवा दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील.
टॉवरची संख्या कमी असल्याने कॉल ड्रॉप होतात, असे टेलिकॉम कंपन्यांतर्फे सांगण्यात आले. त्यानुसार कॉल ड्रॉप ड्राईव्ह टेस्टच्या प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. दिल्ली, मुंबई, इंदूरसह ७ शहरांत कॉल ड्रॉपसाठी दुसऱ्यांदा ड्राईव्ह टेस्ट केली जाईल आणि वस्तुस्थिती काय? हे पाहिले जाईल.
टेलिकॉम कंपन्यांची संघटना सीईओआयचे डी.जी. राजन मॅथ्यू म्हणाले की, आम्हाला ट्रायच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर आम्ही रणनीती निश्चित करू. एयूएसपीआयचे डी.जी. अशोक सूद म्हणाले की, आजच्या बैठकीत कॉल ड्रॉपच्या दोन मुद्यांवर चर्चा झाली. त्यात कॉल ड्रॉप होऊ नयेत म्हणून सर्व प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले. आणखी पाच शहरांत कॉल ड्रॉप टेस्ट ड्राईव्ह करण्यावरही ट्राय सहमत झाली आहे.
ट्रायच्या कडक धोरणावर बोलताना व्हिडिओकॉनचे संचालक आणि सीईओ अरविंद बाली म्हणाले की, ट्रायने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी टेलिकॉम कंपन्या प्रयत्न करतील. भरपाई देण्याच्या निर्णयाने टेलिकॉम कंपन्यांच्या अडचणी वाढतील आणि उत्पन्नावरही परिणाम होईल.
कॉल ड्रॉपवर भरपाई द्यावी लागणार
कॉल ड्रॉपप्रकरणी भरपाई देण्याबाबत टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या मागण्या ट्रायने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे कॉल ड्रॉप झाल्यानंतर या टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे.
By admin | Published: October 29, 2015 09:34 PM2015-10-29T21:34:54+5:302015-10-29T21:34:54+5:30