Join us

Call Forwarding: १५ एप्रिलपासून USSD कॉल फॉरवर्डींग सुविधा होणार बंद; का घेतला हा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:56 PM

दूरसंचार विभागाकडून सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना देण्यात आल्या असून १५ एप्रिलपासून ही सुविधा बंद करण्यास सांगण्यात आलंय.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दूरसंचार विभागाकडून सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना देण्यात आल्या असून १५ एप्रिलपासून ही सुविधा बंद करण्यास सांगण्यात आलंय. 

दूरसंचार विभागाची ही सूचना USSD वर आधारित कॉल फॉरवर्डिंगसाठी आहे. विभागानं दूरसंचार कंपन्यांना १५ एप्रिलपासून USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग बंद करण्यास सांगितलंय. तसंच, सरकारनं कंपन्यांना कॉल फॉरवर्डिंगच्या सुविधेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासही सांगितलं. 

यूएसएसडी आधारित सेवा म्हणजे काय? 

USSD आधारित सेवांतर्गत, ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात, ज्यामध्ये कॉल फॉरवर्डिंगची सुविधा देखील समाविष्ट आहे. याशिवाय आयएमईआय नंबर तपासण्यापासून बॅलन्स तपासण्यापर्यंतची अनेक कामे यूएसएसडीद्वारे केली जातात. या सेवांमध्ये ग्राहकाला त्याच्या फोनवरून अॅक्टिव्ह कोड डायल करावा लागतो. अॅक्टिव्ह कोड हा हॅशटॅग आणि स्टार यांसारखी चिन्हं आणि अंकांचा मिळून तयार केलेला असतो. 

सायबर फसवणुकीमध्ये वापरण्याची शक्यता 

फोनशी संबंधित सायबर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये USSD सेवांचा गैरवापर होत असल्याची भीती सरकारनं व्यक्त केली आहे. या कारणास्तव, सरकारने १५ एप्रिलपासून USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटावर आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा म्हणजेच USSD ला *401# सेवा देखील म्हणतात. 

पुन्हा अॅक्टिव्हेट करावी लागणार 

सरकारच्या सूचनेनंतर यूएसएसडी आधारित कॉल फॉरवर्डिंग सुविधा १५ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. दूरसंचार कंपन्या ग्राहकांना कॉल फॉरवर्डिंग सेवा पुन्हा अॅक्टिव्हेट करण्याचा पर्याय देऊ शकतात, असं सरकारनं दूरसंचार कंपन्यांना म्हटलंय. ज्या ग्राहकांनी सध्या त्यांच्या फोनमध्ये USSD कॉल फॉरवर्डिंग सुविधा अॅक्टिव्हेट केली असेल त्यांना १५ एप्रिलनंतर कंपन्या सेवा पुन्हा अॅक्टिव्हेट करण्यास सांगतील. यासाठी ग्राहकांना USSD व्यतिरिक्त इतर पर्याय दिले जातील. ग्राहकांच्या संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय कॉल फॉरवर्डिंग सुविधा अॅक्टिव्हेट होणार नाही याची खात्री करण्यास कंपन्यांना सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :सरकारसायबर क्राइम