मायानगरी मुंबईत पैसा आणि संधींची कमतरता नाही असं म्हणतात. या शहरानं अनेकांचं नशीब बदललं. मोजकेच पैसे आणि आपली स्वप्न उराशी बाळगून मुंबईत येऊन आज मोठी ओळख असलेले कलाकार उद्योजक अशी काहींची कहाणी आपल्याला माहितच असेल. आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची कहाणी सांगणार आहोत, ज्यांनी केवळ १०० रुपये खिशात घेऊन मुंबई गाठली. पण आज ते कोट्यवधींचे मालक आहेत.
विशेष म्हणजे प्रसिद्ध उद्योगजक बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या शाहरुख खानचे शेजारी आहेत. मुंबईत राहणारे सुभाष रुनवाल हे अब्जाधीश उद्योजक आहेत आणि तसंच ते शेजारी असलेल्या शाहरुख खानपेक्षा कितीतरी पटीनं श्रीमंत आहेत. पाहूया कसा होता रुनवाल यांचा आजवरचा प्रवास.
कोण आहेत सुभाष रुनवाल?
८० वर्षीय सुभाष रुनवाल हे मुंबईतील आघाडीच्या डेव्हलपर्सपैकी एक आहेत. ते रुनवाल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी अफोर्डेबलपासून लक्झरी अपार्टमेंट्स आणि शॉपिंग मॉल्सची उभारणी करते. सुभाष रुनवाल यांचा प्रवास महाराष्ट्रात असलेल्या धुळ्यातील छोट्याशा गावातून सुरू होते. त्या ठिकाणी त्यांचं बालपण अतिशय गरीबीत गेलं.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, पुण्यात शिक्षण घेऊन बीकॉमची पदवी पूर्ण केल्यानंतर, रुनवाल वयाच्या २१ व्या वर्षी अकाउंटंट होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आले. १९६४ मध्ये जेव्हा ते मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त १०० रुपये होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते सीए झाले आणि एका कंपनीत काम करू लागले. १९६७ मध्ये त्यांना अमेरिकेत मोठ्या पगारावर कंपनीतून मोठी पोस्टिंग मिळाली, पण तिथल्या जीवनशैलीशी जुळवणं कठीण जात असल्यानं ते पुन्हा भारतात आले.
रिअल इस्टेटमध्ये मोठं नाव
यानंतर त्यांनी केमिकल कंपनीत काम केलं पण १९७८ मध्ये त्यांनी आपला स्वतःचा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली. त्यांची पहिली मालमत्ता ठाण्यात २२ एकरांची होती आणि त्याच शहरातील किर्तीकर अपार्टमेंट नावाची १०,००० चौरस फुटांची हाऊसिंग सोसायटी हा त्यांचा पहिला प्रकल्प होता. लोकांना कमी किमतीत घरे उपलब्ध करून दिल्यानं ते प्रसिद्धही झाले.
भाड्याचं घर ते शाहरुखचे शेजारी
हळूहळू सुभाष रुनवाल यांचा रिअल इस्टेट व्यवसाय वाढत गेला. २००२ मध्ये रुनवाल ग्रुपन मुंबईतील मुलुंड परिसरात आपला पहिला आर मॉल सुरू केला. सिंगापूरच्या सरकारी कंपनीच्या गुंतवणुकीतून त्यांनी घाटकोपरमध्ये १.२ दशलक्ष चौरस फुटाचा आरसिटी मॉल उभारला.
जेव्हा त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली तेव्हा रुनवाल मुंबईतील कुर्ला भागात भाड्याच्या वन रूम-किचनमध्ये राहत होते. त्यानंतर ते घाटकोपरमध्ये दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहण्यास गेले. मात्र आज सुभाष रुणवाल बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत या बंगल्याशेजारी आलिशान घरात राहतात. सुभाष रुणवाल यांची एकूण मालमत्ता ११,५०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.