नवी दिल्ली, दि. 5 - मोदी सरकारनं पुन्हा एकदा काळापैशाविरोधात मोहीम उघडली आहे. काळा पैसा बाळगणा-या 2 लाख बोगस कंपन्यांची बँक खाती बॅन करण्यात आली आहेत. नोटाबंदीनंतर ज्या 2 लाख बोगस कंपन्यांना बंद करण्यात आले होते. त्या कंपन्यांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. बोगस कंपन्यांची बँक खाती बॅन केल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे.कथित बोगस कंपन्या पुन्हा डोकं वर काढू नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बँकांनाही या संबंधित सूचना देण्यात आली आहे. बोगस कंपन्यांवर कारवाई करण्याचे संकेत मोदी सरकारनं जुलै महिन्यातच दिले होते. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2,09,032 कंपन्यांना रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडून बंद करण्यात आलं आहे. या कंपन्यांचे संचालक आणि अधिकारी आता माजी संचालक आणि माजी अधिकारी बनणार आहेत. जोपर्यंत बोगस कंपन्यांप्रकरणी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडून कायदेशीररीत्या मार्ग काढला जात नाही, तोपर्यंत या कंपन्यांचे बँक अकाऊंट गोठवण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयानंही अधिकृत ट्विटर हँडलरवरून याची माहिती दिली आहे.डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेजनं सर्व बँकांना निर्देश दिले आहेत की, बोगस कंपन्यांच्या खाती गोठवण्यासाठी तात्काळ पाऊल उचलावं. तसेच बँकांनी इतर कंपन्यांशी व्यवहार करताना सतर्कता बाळगत अशा कंपन्यांना करडी नजर ठेवावी, असी सूचना केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. आता नोटाबंदीनंतर किती काळा पैसा समोर आला याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने एका संसदीय समितीला उत्तर देताना सांगितले आहे. तसेच 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटा बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये किती बेहिशोबी काळा पैसा पांढरा झाला याचाही आकडा आपल्याकडे नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत 15.28 लाख कोटी किमतीच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली होती. तसेच अधिक तपासानंतर अचूक आकडा हाती येईल, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. मात्र 8 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला लगाम लागेल, तसेच अन्य लाभ होतील असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या सुमारे 99 टक्के नोटा चलनात परत आल्याचे समोर आल्यानंतर नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. रिझ्रर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही या निर्णयावर टीका करताना नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकारला आधीच बजावले होते असे सांगितले होते.रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील आकडेवारी जाहीर करताना बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे 99 टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्या आहेत. केवळ 1 टक्का नोटा जमा झालेल्या नाहीत, असे या आकडेवारीत नमूद केले होते. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या 6700 दशलक्ष नोटांपैकी फक्त 89 दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत. बंद नोटांच्या स्वरूपात चलनात असलेल्या 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळाले आहेत. 1 हजार रुपयांच्या 1.3 टक्के नोटा बँकांत जमा झालेल्या नाहीत. त्यांची किंमत 8.9 कोटी रुपये आहे.
काळापैशाविरोधात पुन्हा उघडली मोहीम, 2 लाख बोगस कंपन्यांची बँक खाती बॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 8:35 PM