नवी दिल्ली: देशातील वाढती महागाई, रशिया-युक्रेन लाबंलेले युद्ध आणि अन्य जागतिक घटनांचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होत आहेत. एकीकडे शेअर मार्केटची पडझड होत असली, तरी दुसरीकडे अनेकविध क्षेत्रातील कंपन्यांचे आयपीओ धडकत आहेत. शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू असताना, एका कंपनीच्या आयपीओने गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मालामाल केले आहे. गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या आयपीओमध्ये २३ टक्क्यांची वृद्धी पाहायला मिळाली.
शेअर मार्केटमधील प्रतिकूल परिस्थितीत 'कॅम्पस अॅक्टिव्हवेअर'ने भाग्यवान गुंतवणूकारांची झोळी भरली आहे. 'कॅम्पस अॅक्टिव्हवेअर'च्या शेअरची शेअर मार्केटमध्ये जबरदस्त नोंदणी झाली. हा शेअर आयपीओतील इश्यू प्राईसच्या तुलनेत २३ टक्के प्रिमियवर सूचीबद्ध झाला.
कंपनीचा आयपीओ तब्बल ५१ पटीने सबस्क्राईब झाला
कॅम्पस अॅक्टिव्हवेअर लिमिटेड प्राथमिक समभाग विक्रीला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला होता. कंपनीचा आयपीओ तब्बल ५१ पटीने सबस्क्राईब झाला होता. आयपीओतून कंपनी ३ कोटी ३६ लाख शेअरची विक्री करणार आहे, मात्र प्रत्यक्षात १७४ कोटी शेअर्ससाठी गुंतवणूकदारांनी बोली लावली होता. त्यामुळे कॅम्पस अॅक्टिव्हवेअरच्या लिस्टींगकडे गुंतवणूकदारांचे डोळे लागले होते. बीएसईवर 'कॅम्पस अॅक्टिव्हवेअर'चा शेअर २२ टक्के वाढीसह ३५५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात 'कॅम्पस अॅक्टिव्हवेअर'ने ३६० रुपयांना पदार्पण केले. त्यात २३ टक्के वाढ नोंदवली गेली. आयपीओसाठी कंपनीने २९२ रुपये प्रती शेअर असा भाव निश्चित केला होता.
दरम्यान, या कंपनीचा आयपीओ २६ ते २८ एप्रिल २०२२ दरम्यान खुला झाला होता. या योजनेसाठीचा किंमतपट्टा प्रत्येक इक्विटी समभागासाठी २७८ रुपये ते २९२ रुपये इतका निश्चित करण्यात आला. हा आयपीओ ५१.७५ पटीने सबस्क्राईब झाला होता. तत्पूर्वी कंपनीने अॅंकर गुंतवणूकदारांकडून ४१८ कोटींचे भांडवल उभारले होते. या दमदार लिस्टिंगने आयपीओत शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.