Join us  

फुटवेअर क्षेत्रात गुंतवणुकीची संधी! ‘ही’ कंपनी आणतेय IPO; किती कोटींचा निधी उभारणार? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 3:43 PM

आता शूज निर्माता कंपनीने IPO आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. 

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षांत शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. विक्रमी वाढीमुळे गुंतवणूकदार मालामाल झालेले दिसले, तसेच शेकडो अंकांची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसानही झाले. मात्र, असे असले तरी IPO ची धूमधडाका असल्याचे दिसले. एकामागून एका कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल झाले. काही कंपन्यांचे आयपीओ सुपरहीट ठरले, तर काही कंपन्यांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. यातच आता शूज निर्माता कंपनीने IPO आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. 

स्पोर्ट्स आणि अ‍ॅथलेटिक फुटवेअर बनवणारी कंपनी कॅम्पस अ‍ॅक्टिव्हविअर आपला आयपीओ घेऊन येणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. DRHP नुसार, हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर असेल. या अंतर्गत कंपनीच्या प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे ५.१ कोटी इक्विटी शेअर्स विकले जातील. या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा कंपनीचा मानस असे सांगितले जात आहे. 

टीपीजी ग्रोथ आणि क्यूआरजी एंटरप्रायझेसची हिस्सेदारी

प्रवर्तक हरी कृष्ण अग्रवाल आणि निखिल अग्रवाल हे ओएफएस अंतर्गत समभाग ऑफर करणार्‍यांपैकी आहेत. या व्यतिरिक्त, त्यात टीपीजी ग्रोथ लिमिटेड आणि क्यूआरजी एंटरप्रायजेस लिमिटेड यांसारख्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. आताच्या घडीला कंपनीमध्ये प्रवर्तकांची ७८.२१ टक्के हिस्सेदारी आहे. तसेच, टीपीजी ग्रोथ आणि क्यूआरजी एंटरप्रायझेसची अनुक्रमे १७.१९ टक्के आणि ३.८६ टक्के हिस्सेदारी आहे. सार्वजनिक समस्यांवर कंपनीला सल्ला देण्यासाठी बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, जेएम फायनान्शियल, सीएलएसए इंडिया आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी यांची मर्चंट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, कॅम्पस अ‍ॅक्टिव्हविअरने २००५ मध्ये 'कॅम्पस' ब्रँड सादर केला. ही एक जीवनशैलीसंबंधी आणि क्रीडापटूंचे फुटवेअर बनविणारी कंपनी आहे. तसेच संपूर्ण कुटुंबासाठी विविध उत्पादनांचा पोर्टफोलिओ प्रदान करते. २०२० या आर्थिक वर्षात कंपनीचा भारतातील ब्रँडेड स्पोर्ट्स आणि ऍथलीजर फुटवेअर उद्योगात जवळपास १५ टक्के वाटा आहे. तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये सुमारे १७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 

 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार