Join us

विना फंडिंग उभी केली देशातील सर्वात मोठी शू कंपनी, दिल्लीच्या हरी कृष्ण अग्रवालांनी कशी केली कमाल?

By जयदीप दाभोळकर | Updated: March 17, 2025 12:52 IST

Campus Shoes Success Story: देशात अनेक शू कंपन्या आहे. काही कंपन्या प्रीमिअम सेगमेंटमध्ये काम करतात, तर काही कंपन्या सामान्य लोकांना परवडणाऱ्या किंमतीत शूज उपलब्ध करुन देतात. कॅम्पस अॅक्टिव्हविअर ही देशातील सर्वात मोठी शू कंपनी आहे.

Campus Shoes Success Story: देशात अनेक शू कंपन्या आहे. काही कंपन्या प्रीमिअम सेगमेंटमध्ये काम करतात, तर काही कंपन्या सामान्य लोकांना परवडणाऱ्या किंमतीत शूज उपलब्ध करुन देतात. कॅम्पस अॅक्टिव्हविअर ही देशातील सर्वात मोठी शू कंपनी आहे. या कंपनीनं नायकी, अडिडास आणि पुमासारख्या दिग्गज ब्राँड्सना मागे सोडलंय. कंपनीचे २०,००० हून अधिक रिटेल आउटलेट्स आणि ३५ हून अधिक एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आहेत. कंपनीचे देशभरात ५ युनिट्स असून ती अनेक देशांना शूज निर्यात करते. ही कंपनी दरवर्षी १.५ कोटी पेअर शूजची विक्री करते. सचिन तेंडुलकर आणि वरुण धवन सारख्या सेलिब्रिटींनी या कंपनीची जाहिरात केलीये. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या हरी कृष्ण अग्रवाल यांनी ही कमाल कशी केली जाणून घेऊ.

हरी कृष्ण अग्रवाल हे पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत. म्हणजे त्यांना कुठल्याही व्यवसायाचा वारसा नव्हता, पण एवढा मोठा व्यवसाय त्यांनी स्वत:च्या बळावर उभा केला. गरिबीमुळे त्यांना लहानपणापासूनच त्यांना नोकरी करावी लागली आणि त्यांनी व्यवसायातील बारकावे शिकले. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी छोट्या छोट्या व्यवसायात हात आजमावण्यास सुरुवात केली. १९८३ मध्ये त्यांनी 'अॅक्शन' ब्रँडअंतर्गत स्पोर्ट्स शूज विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांच्याकडे निधी नव्हता. मित्र परिवाराच्या पैशातून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

परदेशी कंपन्यांवर भारी

१९९१ मध्ये भारतीय बाजारपेठ परदेशी कंपन्यांसाठी खुली झाल्यानंतर अडिडास, नायकी, प्युमा असे अनेक नामवंत ब्रँड भारतात आले. या कंपन्यांचे शूज अतिशय महाग आणि सर्वसामान्य भारतीयांच्या आवाक्याबाहेर होते. अग्रवाल यांना हे समजलं आणि त्यांनी २००५ मध्ये कॅम्पस शूजची सुरुवात केली. त्यांनी खास करून स्पोर्ट्स शूजला टार्गेट केलं. गुणवत्तेच्या बाबतीत त्यांच्या कंपनीचे शूज अडिडास आणि नायकीशी स्पर्धा करत होते, तर त्यांची किंमत खूपच कमी होती. पहिल्याच वर्षी कंपनीला कोट्यवधी रुपयांचा नफा झाला. कंपनीनं प्रीमियम श्रेणीतही प्रवेश केला. एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या बाजारात त्याचा वाटा सुमारे ४८ टक्के आहे.

कॅम्पस अॅक्टिव्हवेअर लिमिटेडचे शेअर्स मे २०२२ मध्ये आयपीओ किंमतीच्या २३% पेक्षा जास्त प्रीमियमवर लिस्ट झाले. कंपनीच्या आयपीओनंतर हरि कृष्ण अग्रवाल यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. फोर्ब्सनुसार, त्यांची नेटवर्थ १.१ अब्ज डॉलर आहे. २०२३ मध्ये कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विस्तार केला. त्याची सुरुवात इंडोनेशिया आणि मलेशियापासून झाली. हरी कृष्ण अग्रवाल यांचा मुलगा निखिल अग्रवाल हे इंडस्ट्रियल इंजिनिअर असून आता ते कंपनीचे सीईओ आहेत.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय