नवी दिल्ली : मुदत ठेवीप्रमाणे (एफडी) आवर्ती ठेवी (आरडी)सुद्धा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानल्या जातात. ‘एफडी’मध्ये एकरकमी ठेव बँकेत ठेवावी लागते, ‘आरडी’मध्ये दरमहा ठरावीक रक्कम हप्त्यासारखी भरावी लागते. बँका आणि पोस्ट ऑफिस, अशा दोन्ही ठिकाणी आरडी सुविधा मिळते.
विशेष म्हणजे मुदत ठेवीप्रमाणेच आवर्ती ठेवींवरही कर्ज सुविधा मिळू शकते. पैशांची तातडीची गरज भासल्यास तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता. अनेक बँकांमध्ये आवर्ती ठेव योजना सुरू असते. त्यावर उत्तम व्याज मिळते. ज्यावेळी गरज आहे, त्यावेळी ही रक्कम काढता येते.
कसे काढाल कर्ज?
पोस्ट ऑफिसात ५ वर्षांच्या आरडी खात्यावर सलग १२ हप्ते भरले असल्यास कर्ज सुविधा उपलब्ध म्हणजेच कर्ज सुविधेसाठी किमान १ वर्ष हप्ता भरणे आवश्यक आहे. १ वर्षानंतर जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळू शकते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा मासिक हप्त्यात केली जाऊ शकते.
किती लागते व्याज? : तुम्हाला आरडी ठेवीवर जेवढे व्याज मिळते, त्यापेक्षा २ टक्के अधिक व्याज कर्जावर भरावे लागते. सध्या पोस्टातील आरडीवर ६.५ टक्के व्याज मिळते. याचाच अर्थ तुम्हाला कर्जावर ६.५ अधिक २ टक्के म्हणजेच ८.५ टक्के व्याज भरावे लागेल. हे कर्ज फेडले न गेल्यास परिपक्वतेच्या वेळेस व्याजासह होणारी रक्कम आरडी ठेवीतून कापून घेतली जाईल व उरलेली रक्कम तुम्हाला मिळेल. १०० रुपयांत आरडी खाते सुरू करता येते. कितीही अधिक रकमेचे खाते तुम्ही काढू शकता. त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते.