नवी दिल्ली : महागाईच्या दरात घसरण होत असल्यामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून २0१५ सालच्या पहिल्या सहामाहीत धोरणात्मक व्याजाच्या दरात अर्ध्या टक्क्याची कपात होऊ शकते. या क्षेत्रातील जाणकारांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.
जागतिक पातळीवर ब्रोकरिंगचे काम करणाऱ्या बँक आॅफ अमेरिका, मेरिल लिंच, बार्कलेज, सिटी ग्रुप आणि एचएसबीसी यांच्या मते, २0१५ हे संपूर्ण वर्ष महागाईच्या दृष्टीने अनुकूल राहू शकते. वास्तविक मान्सून कसा राहतो, यावर बरेच काही अवलंबून राहील. मान्सून चांगला राहिला नाही, तर महागाईची जोखीम वाढू शकते. तथापि, मान्सून येईपर्यंत वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहतील, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाआधीच धोरणात्मक व्याजदरांत कपात करण्यास मोठा वाव आहे.
एचएसबीसीने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात म्हटले की, मार्च-एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँक धोरणात्मक व्याजदरात पाव टक्का कपात करू शकते. त्यानंतर जूनमध्ये पुन्हा पाव टक्क्याची कपात होऊ शकते. याचाच अर्थ पहिल्या सहा महिन्यांत एकूण अर्ध्या टक्क्याची कपात झालेली असेल.
बोफा-एमएलच्या अभ्यासात म्हटले आहे की, ७ एप्रिल रोजीच्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे पाव टक्क्याची कपात करू शकतात. जूनमध्ये पुन्हा तेवढीच कपात होण्याची शक्यता आहे.
सिटी ग्रुपने म्हटले की, अर्थसंकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अपेक्षा पाहता व्याजदरात जवळपास पाऊण टक्का कपात करण्यास वाव आहे. यावर आताच निर्णायक वक्तव्य करता येणार नाही. जीडीपीसंबंधी रिझर्व्ह बँकेचे आकडे काय असतात यावर बरेच काही अवलंबून राहील. तरीही सध्याची परिस्थिती कपातीला अनुकूल आहे, असे संकेत मिळत आहेत. जूनपर्यंत ही कपात होऊ शकते.
यंदा पहिल्या सहामाहीत होऊ शकते अर्धा टक्का दर कपात
महागाईच्या दरात घसरण होत असल्यामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून २0१५ सालच्या पहिल्या सहामाहीत धोरणात्मक व्याजाच्या दरात अर्ध्या टक्क्याची कपात होऊ शकते.
By admin | Published: February 18, 2015 12:21 AM2015-02-18T00:21:47+5:302015-02-18T00:21:47+5:30