Join us

एका ओटीपीवर बदलता येणार पोस्टपेड मोबाइल प्रीपेडमध्ये, जाणून घ्या कधीपासून होणार सुरुवात?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:40 AM

Mobile Service: पोस्टपेडमधून प्रीपेड किंवा प्रीपेडमधून पोस्टपेड सेवा घेण्यासाठी सुलभ प्रक्रिया असावी, त्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनने केली होती.

मुंबई : आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय पोस्टपेड सेवा प्रीपेडमध्ये किंवा प्रीपेड सेवा पोस्टपेडमध्ये रूपांतरित करता येणार आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने (डॉट) ही प्रक्रिया सुलभ करण्यास पाऊल उचलले असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.एखाद्या ग्राहकाला सध्या वापरत असलेली पोस्टपेड सेवा प्रीपेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी बऱ्याच क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. या सगळ्या प्रक्रियेत किमान १० दिवस किंवा त्याहूनही अधिक कालावधी लागतो. त्यामुळे पोस्टपेडमधून प्रीपेड किंवा प्रीपेडमधून पोस्टपेड सेवा घेण्यासाठी सुलभ प्रक्रिया असावी, त्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनने केली होती. दूरसंचार विभागाने त्याची दखल घेतली आहे.यासंदर्भात दूरसंचार कंपन्यांकडून सर्व तपशील मागविण्यात आला असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पोस्टपेड किंवा प्रीपेडसेवा रूपांतरित करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा केवायसीची गरज भासणार नाही. केवळ ओटीपीद्वारे येणाऱ्या सांकेतिक क्रमांकाच्या मदतीने ही सेवा बदलता येईल. विशेष म्हणजे यासाठी मोबाइल सीमकार्ड बदलण्याचीही गरज भासणार नाही. 

कधीपासून सुरुवात होणार?दूरसंचार विभागाने या नियमाच्या अंमलबजावणीकरिता सर्व दूरसंचार कंपन्यांना 'पीओसी' या यंत्रणेत आवश्यक बदल अथवा सुधारणा करण्याची सूचना केली आहे. ‘पीओसी’ संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच ओटीपी आधारित सुविधा सुरू केली जाईल. हा बदल सर्वच ग्राहकांसाठी सोयीचा आहे. शिवाय कोरोनासारख्या काळात संपर्कविरहित सेवा म्हणून याचा चांगला फायदा होईल, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. 

टॅग्स :मोबाइलव्यवसाय