प्रश्न : मी यूएस कौन्सुलेटमध्ये येऊन माझी कागदपत्रे नोटराइज्ड करू शकतो का ?
उत्तर : अमेरिकेत वापरण्यात येणारी काही कागदपत्रे भारतीय नागरिक यूएस कौन्सुलेट जनलरच्या मुंबई कार्यालयामध्ये नोटराईज करू शकतो. या सेवेकरिता तुम्ही अमेरिकी नागरिक असण्याची गरज नाही; परंतु त्या कागदांचा अमेरिकेशी संबंध हवा. प्रतिज्ञापत्र, पॉवर ऑफ अॅटर्नी, वित्तीय किंवा बांधकामाची कागदपत्रे किंवा मुलाच्या पासपोर्ट अर्जाकरिता कन्सेंट, अशा काही अमेरिकेत वापरात येणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी भारतीय नागरिकांना यूएस नोटरी लागू शकते. बहुतांश अमेरिकी राज्यांमध्ये परदेशातील नोटरी सीलला मान्यता नाही. त्यामुळे अमेरिकेला जातेवेळी ही सेवा भारतीय नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकते.
जेव्हा तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंटसाठी येता, तेव्हा नोटरायझेशन करणारा अधिकारी तुम्हाला ही सेवा हवी आहे, याकरिता तुमची पडताळणी करू शकतो. तसेच तुम्ही ज्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणार आहात, ती कागदपत्रे तुम्हाला माहिती आहेत, याबाबत काही प्रश्न विचारू शकतो. तुमच्याखेरीज तुमच्या वतीने अन्य कुणी त्या कागपदत्रांवर सही करू शकत नाही. काही कागदपत्रांकरिता साक्षीदाराची आवश्यकता असते. यूएस कौन्सुलेटचे कर्मचारी साक्षीदार म्हणून काम करू शकत नाहीत. जर तुमच्या कागदपत्रांकरिता साक्षीदाराची गरज आहे अथवा नाही, याची तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही तुमच्या कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता. जर तुमच्या कागदपत्रांकरिता साक्षीदाराची गरज असेल तर तो साक्षीदार आणण्याची व्यवस्था तुम्हाला स्वतःलाच करावी लागेल.
नोटरी सेवेसाठी प्रति शिक्का ५० डॉलरची आकारणी केली जाते. तुमची कागदपत्रे यूएस कौन्सुलेटमध्ये नोटराइज्ड करणे गरजेचे आहे किंवा कसे हे ठरविण्यासाठी आणि मुलाखतीसाठी https://in.usembassy.gov/ येथे संपर्क करून 'यूएस सिटीझन सर्व्हिसेस' या पेजवर 'नोटरीयल सर्व्हिस टॅब' हा पाहावा.