नवी दिल्ली - बाहेर जेवायला जाणे किंवा रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करणे आता महाग होत चालले आहे. आता बाहेरून चॉकलेट ऑर्डर करणेही खिशाला भारी पडणार आहे. चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे कोको ४० टक्के महागल्याने कंपन्या दर वाढवू शकतात. वर्षाच्या सुरुवातीपासून कोकोच्या किमती वाढून दशकभरातील उच्चांकी पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता कंपन्या चॉकलेटची किंमत तीच ठेवून आकार कमी करू शकतात.
सध्या कोकोसाठी प्रति टन १० हजार डॉलर्सपेक्षा अधिक किंमत मोजावी लागते. जानेवारी-मार्च तिमाहीत कोकोच्या किमती मागील तिमाहीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्या आहेत.
पॅक आणखी छोटा?उत्पादकांनी मिल्क चॉकलेटचे उत्पादन थांबविले आहे. डार्क चॉकलेटच्या किमतीही वाढल्या आहेत. ग्राहकाच्या खिशावर किमतीचा ताण पडू नये म्हणून उत्पादक चॉकलेटच्या पॅकचा आकार कमी करण्याच्या विचारात आहेत.
का वाढताहेत भाव? - गेल्या तिमाहीत कोको, कॉफी, पाम तेल आणि साखरेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या, कोको आणि कॉफीच्या किमती सर्वकालिका उच्चांकावर आहेत.- पाम तेलाच्या दरातही वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे रेस्टॉरंट आणि कॅफे चेन चालक चॉकलेटचे भाव वाढवण्याच्या विचारात आहेत. - कोकोच्या किमतीत या तीव्र वाढीला आयव्हरी कोस्ट या जगातील सर्वात मोठ्या कोको उत्पादक देशाकडून कमी झालेला पुरवठा हे प्रमुख कारण आहे. - पश्चिम आफ्रिकेतील प्रतिकूल हवामानामुळे स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे कोको उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.