लंडन : विविध देशांची सरकारे, कंपन्या, उद्योग आणि वैयक्तिक कर्जाचे प्रमाण तब्बल २५५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे. म्हणजेच, सरासरी दरडोई ३२ हजार ५०० डॉलर कर्जाचे प्रमाण असल्याची आकडेवारी इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल फायनान्सने (आयआयएफ) जाहीर केली आहे.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये विविध सरकारे आणि विविध कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जामधे दीड टक्क्याची वाढ नोंदविण्यात आली. तर, बिगर वित्तीय कंपन्यांच्या कर्जामध्ये १ टक्क्याची वाढ झाली. जगाची लोकसंख्या ७.७ अब्ज इतकी आहे. या लोकसंख्येशी तुलना करता ३२ हजार ५०० डॉलर दरडोई कर्जाचे प्रमाण होते. अमेरिका आणि चायना या दोन देशंतील कर्जाचे प्रमाण तब्बल ६० टक्के इतके आहे. तसेच, यातील तब्बल ७० ट्रिलियन डॉलर कर्ज सरकार, कॉर्पोरेट आणि अर्थ क्षेत्रातील संबंधित संस्थांचे आहे. सध्याची स्थिती पाहता या अर्थवर्ष अखेरीस २५५ ट्रिलियनचा आकडा सहज पार केला जाईल. विविध देशांच्या सरकारने घेतलेल्या कर्जाचा टक्का पहिल्या सहामाहीत दीड टक्क्यानी वाढला आहे. तर, बिगर अर्थ क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्जामध्ये एक टक्क्याची वाढ झाली. बँक आॅफ अमेरिका मेरिल लिंचने केलेल्या विश्लेषणानुसार लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीमुळे अमेरिकन सरकारला ३० ट्रिलियन डॉलरचे कर्ज घ्यावे लागले. विविध कंपन्यांना २५ आणि वैयक्तिक ९ आणि बँकांनी २ ट्रिलियन डॉलरचे कर्ज घेतले आहे. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीवरीन आयआयएफने कर्जाची आकडेवारी दिली आहे.दरम्यान, सरकारी रोख्यातील गुंतवणूक २००९ मध्ये ८७ ट्रिलियन डॉलर होती. त्यात ११५ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. बँकेच्या रोख्यांमधे मात्र दहा टक्क्यांची घट झाली असल्याचे निरीक्षण आयआयएफने नोंदविले आहे. (वृत्तसंस्था)सन २०१९च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीअखेर (जून) भारतावरील कर्ज ८८.१८ लाख कोटी होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत हा जागतिक बँकेचा (वर्ल्ड बँकेचा) बडा कर्जदार देश राहिला आहे. गेल्याच आठवड्यात ‘आयएमएफ’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार यंदा भारताचा विकास दर ६.१ %, तर २०२० मध्ये तो ७ % राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, एकूण जागतिक कर्जामध्ये शेजारी एकट्या चीनचा वाटा १५% इतका सर्वाधिक आहे.जगाची लोकसंख्या ७.७ अब्ज इतकी आहे. या लोकसंख्येशी तुलना करता दरडोई कर्जाचे प्रमाण ३२ हजार ५०० डॉलर आहे.
दरडोई कर्जाचे प्रमाण पोहोचले ३२ हजार डॉलर्सवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 2:26 AM