Lokmat Money > बिझनेस न्यूज > चार मोठ्या बॅँकांची भांडवलविक्री शक्य; आर्थिक स्थिती सुधारणार

चार मोठ्या बॅँकांची भांडवलविक्री शक्य; आर्थिक स्थिती सुधारणार

सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांचे प्रयत्न, समभागांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 03:01 AM2020-08-24T03:01:12+5:302020-08-24T03:01:22+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांचे प्रयत्न, समभागांची विक्री

Capital sale of four large banks possible; The economic situation will improve | चार मोठ्या बॅँकांची भांडवलविक्री शक्य; आर्थिक स्थिती सुधारणार

चार मोठ्या बॅँकांची भांडवलविक्री शक्य; आर्थिक स्थिती सुधारणार

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असतानाच चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धामध्ये देशातील चार मोठ्या बॅँका आपल्या समभागांची विक्री करून भांडवलामध्ये वाढ करण्याची शक्यता असल्याचे एका विश्वसनीय सूत्राने सांगितले आहे.

भारतीय स्टेट बॅँक, पंजाब नॅशनल बॅँक, बॅँक आॅफ बडोदा आणि युनियन बॅँक आॅफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रामधील चार बॅँका लवकरच पात्र संस्थागत गुंतवणूकदारांना (क्यूआयबी) समभागांची विक्री करून आपली भांडवलाची गरज पूर्ण करण्याची शक्यता आहे. मात्र सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे बॅँकांची आर्थिक स्थिती काहीशी नाजूक असल्याने या बॅँका दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापर्यंत प्रतीक्षा करणार आहेत.

संस्थागत गुंतवणूकदारांना शेअर्सची विक्री करून भांडवल उभारणी करण्याचा पर्याय हा सर्वात विश्वासार्ह असून, त्यालाच सध्या मोठी पसंती मिळत आहे. अनेक कंपन्यांनी या माध्यमातून आपली भांडवलाची गरज भागविलेली दिसून येते. कोरोनाच्या संकटामुळे अनेक बॅँका अडचणीमध्ये सापडल्या असून, त्यांच्या कर्जाचे हप्ते थकीत राहण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे बॅँकांची अनुत्पादक कर्जे (एनपीए) वाढून बॅँकांच्या रेटिंगवरही त्याचा परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे सरकारने जाहीर केलेल्या एकवेळच्या कर्ज पुनर्रचनेमुळे या बॅँकांकडील कर्ज वाढलेले दिसणार आहे. दुसºया तिमाहीचे निकाल जाहीर होताना बॅँकांची स्थिती सुधारलेली असेल, अशी आशा असल्याने या बॅँका दुसºया सहामाहीमध्ये भांडवल उभारणी करण्याची शक्यता वाटत असल्याचे या सूत्राने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रामधील अनेक बॅँकांनी चालू आर्थिक वर्षामध्ये बॉण्ड्स तसेच समभागांची विक्री करून भांडवल उभारणी करण्यासाठी भागधारकांकडून याआधीच परवानगी मिळवलेली आहे.

बॉण्ड्सची केली विक्री
आपल्या भांडवलाची जरूरत पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बॅँक आणि पंजाब नॅशनल बॅँक आणि बॅँक आॅफ बडोदाने याआधीच बॉण्ड्सच्या विक्रीमधून अनुक्रमे ८९३१ कोटी, ९९४ कोटी आणि ९८१ कोटी रुपये उभारले आहेत. त्यांचा कित्ता अन्य बॅँका गिरवू शकतात.

खासगी बॅँका पुढे : खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅँक, अ‍ॅक्सिस बॅँक व कोटक महिंद्र बॅँकेसह अन्य बॅँकांनी चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्येच या माध्यमामधून आपली भांडवल उभारणी केली असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title: Capital sale of four large banks possible; The economic situation will improve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक