Join us  

४००० जणांना कार-घर दिलं, १३ व्या वर्षी शाळा सोडून केलं काम; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 3:03 PM

सावजी ढोलकिया हे श्री हरी कृष्ण एक्स्पोर्ट्सचे अध्यक्ष आहेत. दरवर्षी दिवाळीत त्यांच्या नावाची चर्चा असते.

सावजी ढोलकिया हे श्री हरी कृष्ण एक्स्पोर्ट्सचे अध्यक्ष आहेत. दरवर्षी दिवाळीत त्यांच्या नावाची चर्चा असते. या दिवशी ते आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देतात. अशा भेटवस्तूंमध्ये कार, घरे आणि महागडे दागिने यांचा समावेश असतो. १९९५ पासून ते हे करत आहेत. ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतात. आपल्या कर्मचाऱ्यांच्या पालकांनाही दरवर्षी ते एका टूरला पाठवतात. आतापर्यंत त्यांनी ४००० हून अधिक लोकांना कार, घरं आणि दागिने भेटवस्तू म्हणून दिले आहेत. पाहूया त्यांचा आजवरचा प्रवास.

१३ व्या वर्षी शाळा सोडलीसावजी ढोलकिया हे गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील दुधाला गावचे रहिवासी आहेत. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली. यानंतर ते आपल्या मामाच्या हिऱ्यांच्या व्यवसायात सहभागी झाले. पुढे त्यांनी आपल्या काकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. डायमंड पॉलिशिंग व्यवसायात १० वर्षे संघर्ष केल्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये हरी कृष्णा एक्सपोर्ट्सची स्थापना केली.

उभारला कोट्यवधींचा व्यवसाय सुरुवातीला कंपनीची विक्री नाममात्र होती. पण, मार्च २०१४ पर्यंत कंपनीची उलाढाल ४०० कोटी रुपयांच्या पुढे गेली. या कंपनीत ६,००० हून अधिक कर्मचारी काम करतात. ९० च्या दशकात त्यांची विक्री फारशी नसली तरी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची काळजीढोलकिया यांनी १९९५ मध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३ कार दिल्या. त्यांनी ४००० हून अधिक लोकांना कार, घरे किंवा दागिने दिले आहेत. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना वर्षातून एकदा टूरची सुविधा दिली जाते. हा दौरा १५ दिवसांचा असतो. या दौऱ्यात ते स्वतः त्यांच्यासोबत १० दिवस राहतात. कर्मचाऱ्यांच्या पालकांची त्यांच्या स्वतःच्या पालकांप्रमाणे ते सेवा करतात. तुम्ही जर आपल्याकडचं काही दिलं तर तुम्हालाही मिळणं सुरू होईल, असं ते म्हणतात.

पद्मश्रीनं सन्मानसावजी ढोलकिया यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. परदेशातही ते हिऱ्यांच्या दागिन्यांची निर्यात करतात. त्यांच्या कंपनीचे हिऱ्यांचे दागिने ५० हून अधिक देशांमध्ये जातात. यामध्ये अमेरिका, बेल्जियम, संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग आणि चीन यांचा समावेश आहे. कंपनीनं सुवर्ण महोत्सवानिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी ५१ कोटी रुपये खर्च केले होते.

२०१५ मध्ये चर्चेतसावजी ढोलकिया २०१५ मध्ये चर्चेत आले होते. त्या वर्षी दिवाळीनिमित्त त्यांनी आपल्या १२०० कर्मचाऱ्यांना दागिने, २०० फ्लॅट आणि ४९१ कार भेट दिल्या. यापूर्वी २०१४ मध्येही त्यांनी कर्मचाऱ्यांना इन्सेन्टिव्ह म्हणून ५० कोटी रुपयांचं वाटप केलं होतं. त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. २०१८ मध्ये त्यांनी ६०० कर्मचाऱ्यांना कार आणि ९०० कर्मचाऱ्यांना दिवाळीत एफडी दिली. त्यांनी आपल्या तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेंझसारख्या महागड्या कार भेट दिल्या होत्या. या तिन्ही कर्मचाऱ्यांनी कंपनीत २५ वर्षे सेवा पूर्ण केली होती.

टॅग्स :व्यवसायगुजरात