मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ आता अधिकच गडद होताना दिसत आहे. याचाच सर्वाधिक जास्त फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसत असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑटो क्षेत्रात तब्बल 19 वर्षांनंतर मंदीची लाट आली असून प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे आशियातील सर्वांत श्रीमंत असलेले बँकर उदय कोटक यांनी ऑटो कंपन्यांना इशारा दिला आहे.
भारतीय ऑटो इंडस्ट्रीने आता संरचनात्मक बदल करण्यास तयार झाले पाहिजे. यापुढे कारच्या महत्वाकांक्षा संपल्या आहेत, असे कोटक बँकेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी सांगितले. यावेळी, उदाहरण देताना आपला मुलगा कार खरेदी करण्याचा विचार करण्यापेक्षा ओला किंवा उबरवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIAM) आयोजित वार्षिक कार्यक्रमात उदय कोटक बोलत होते. यावेळी ते म्हणाले. 'ग्राहकांची पसंती वेगाने बदलत आहे आणि कार उत्पादकांनी सामायिक गतिशीलतेसाठी तयार असले पाहिजे. ऑटो क्षेत्रात स्ट्रक्चरल आणि फिरत्या समस्या आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी काही आत्मपरीक्षण करणं गरजेच आहे. कारण, या क्षेत्रात अंतर्गत बदल आवश्यक आहेत.'
सध्याच्या ऑटो क्षेत्रातील स्थितीबाबत आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे. ऑटो क्षेत्रातील मागणीत दोन प्रकारे वाढ करता येईल. यासाठी उत्पादकांकडून सरकारी खर्च आणि किंमतीचे सुसूत्रीकरण असले पाहिजे, असेही यावेळी उदय कोटक यांनी सांगितले.
दरम्यान, ऑटो क्षेत्रातील मंदीच्या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकीने काल हरियाणातील गुरुग्राम प्लांट आणि मानेसर प्लांटची प्रवासी वाहन निर्मितीचे कामकाज दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या ऑगस्ट महिन्यात ऑटो क्षेत्रातील उत्पादन जवळपास 34 टक्क्यांनी कमी झाले असून सलग सातव्या महिन्यात अशी घट होताना दिसत आहे.