Join us  

मेमध्ये कारच्या विक्रीत किरकोळ घट

By admin | Published: June 10, 2016 6:43 AM

देशांतर्गत बाजारात मे महिन्यात कारच्या विक्रीत 0.८६ टक्का इतकी किरकोळ घट झाली

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात मे महिन्यात कारच्या विक्रीत 0.८६ टक्का इतकी किरकोळ घट झाली, तर मोटारसायकलींची विक्री ३.५४ टक्क्यांनी वाढली. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)ने ही माहिती दिली. मेमध्ये १,५८,९९६ इतक्या कारची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात १,६0,३७१ कारची विक्री झाली होती. याच महिन्यात ९,८५,१५८ इतक्या मोटारसायकलींची विक्री झाली. गेल्या वर्षी या खंडातील दुचाकी विक्रीचा आकडा ९,५३,३११ इतका होता.याच महिन्यात अन्य दुचाकी वाहनांच्या विक्रीत ९.७५ टक्क्यांनी वाढ होऊन १५,१५,५५६ इतक्या वाहनांची विक्री झाली. व्यावसायिक वाहनांची विक्रीही १६.८९ टक्क्यांनी वाढून ५७,0८९ इतक्या वाहनांची विक्री झाली. याशिवाय विविध विभागांत वाहनांची विक्री ९.८९ टक्क्यांनी वाढून १८,५0,७६४ इतक्या वाहनांची विक्री झाली. मे २0१५ मध्ये हा आकडा १६,९४,२६३ इतका होता.ग्रामीण भागातून अजूनही अपेक्षेएव्हढी मागणी नाही. दोन-तीन वर्षांत कमी पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील मागणीत घट झाली आहे. त्यात सुधारणा होण्याचे संकेत आहेत.मे महिन्यात ट्रॅक्टरची विक्री वाढली. यंदा चांगला पावसाळा होण्याचे भाकीत वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यालाही चांगले पीक येण्याची आशा असल्याने ट्रॅक्टरची विक्री वाढली आहे. पाऊस खरोखरच चांगला झाल्यास ट्रॅक्टर विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली एनसीआर परिसरात डिझेलवर आधारित २,000 सीसी मोठ्या इंजिनाच्या कारच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याने, या कारच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे ‘सियाम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले. (लोकमत न्युज नेटवर्क)