नवी दिल्ली : सेकंड-हँड गाड्या विकणारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कार्स 24 ने (Cars24) आपल्या 600 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. कंपनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना असताना हा निर्णय धक्कादायक आहे. दरम्यान, Cars24 मध्ये जवळपास 9000 कर्मचारी काम करतात आणि त्याला सॉफ्टबँक (Softbank) आणि अल्फा वेव्ह इनोव्हेशन (Alpha Wave Innovation) सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे.
कंपनीकडून याला कपात मानण्यास नकार दिला आहे. कंपनीच्या एका प्रवक्त्याकडून सांगण्यात आले की, ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि कामगिरीशी संबंधित आहे. ही प्रक्रिया दरवर्षी फॉलो केलीजाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काढून टाकलेले सर्व कर्मचारी भारतातील आहेत आणि सर्व कनिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.
2015 मध्ये स्थापित Cars24 टेक्निकल वापर करत ग्राहकांना कार खरेदी, विक्री आणि वित्तपुरवठा करण्यात मदत करते. Cars24 ने डिसेंबरमध्ये इक्विटीद्वारे 30 कोटी डॉलर आणि अतिरिक्त 10 कोटी डॉलर निधी उभारला होता. त्यावेळी कंपनीचे मूल्य अंदाजे 3.3 अब्ज डॉलर होते. या निधीतून कंपनीने आपला व्यवसाय इतर देशांमध्ये पसरवण्याची चर्चा केली होती.
Cars24 चे संस्थापक विक्रम चोप्रा म्हणाले की, कंपनीची भविष्यात अतिशय आक्रमक योजना आहे. यामुळे ग्राहकांना नवीन प्रकारचा अनुभव मिळेल. दुसरीकडे, शिक्षण तंत्रज्ञान कंपनी वेदांतूने 'मंदी'ची भीती दाखवत आणखी 424 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वेदांतूने 15 दिवसांपूर्वी 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. यापूर्वी, कंपनीने एका वर्षात 1,000 कर्मचारी भरती करण्याची योजना जाहीर केली होती.