Join us

अरे देवा, आता १०० रुपयांच्या 'या' नोटांमुळे होणार 'मनी'स्ताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 3:06 PM

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेनं १०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवला होता, पण

मुंबईः देशातील १० राज्यांमध्ये चलनतुटवडा भासत असल्याच्या, एटीएममध्ये खडखडाट झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या  होत्या आणि सगळ्यांनाच नोटाबंदीच्या वेळचे 'बुरे दिन' आठवले होते. ही परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली, तरी १०० रुपयांच्या जुन्या, जीर्ण झालेल्या, मळलेल्या नोटांमुळे नागरिकांना पुन्हा 'मनी'स्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. 

२०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांसोबतच १०० रुपयांच्या नोटांचा पुरवठाही कमी असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे. १०० रुपयांच्या बऱ्याच नोटा इतक्या खराब झाल्यात की त्या मशीनमध्ये भरण्यासाठी योग्य नाहीत. त्यातल्या काही तर २००५च्या आधीच्या, म्हणजेच १३ वर्षं जुन्या आहेत. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेनं तातडीने लक्ष घालायला हवं. कारण, १०० रुपयाच्या नव्या नोटा आल्या नाहीत, तर येत्या काळात ५०० रुपयांच्या नोटांची मागणी वाढेल आणि पुन्हा चलनतुटवडा जाणवू शकेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेनं १०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवला होता. २०१६-१७ या वर्षात १०० रुपयांच्या ५५० कोटी नोटा चलनात होत्या, त्या वाढवून ५७३.८ कोटी इतक्या करण्यात आल्या. परंतु, २००० रुपयाची नोट आल्यानं आणि ५००च्या नव्या नोटा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यानं, सुट्या पैशांसाठी १०० रुपयांच्या नोटांचा वापर वाढला होता आणि वाढीव पुरवठाही कमीच पडला होता, असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.  

नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलनतुटवडा दूर करण्यासाठी १०० रुपयांच्या जीर्ण नोटाही चलनात आणल्या गेल्या होत्या. त्या अजूनही वापरात आहेत आणि त्यांची अवस्था अधिकच बिकट झालीय. या नोटांऐवजी नव्या नोटा चलनात न येणं अत्यावश्यक आहे. 

टॅग्स :निश्चलनीकरणएटीएमनोटाबंदी