मुंबई/कोलकता : अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण वाढताच रोखीचे व्यवहार जवळपास पूर्वपदावर म्हणजेच ८ नोव्हेंबरपूर्वीच्या पातळीवर आले आहेत. किरकोळ क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या काउंटरवर हा बदल दिसून आला आहे. ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी लागू केल्यानंतर रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण घटले होते. नोटांबदीच्या काळात रोखीचे व्यवहार ठप्प झाले होते. आॅनलाइन व्यवहारांना चालना मिळत असल्याचे चित्रही निर्माण झाले होते. आता परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत आहे. शॉपर्स स्टॉप, फ्युचर ग्रुप, लाईफस्टाईल इंटरनॅशनल, स्पेन्सर्स आणि मॅक्स या बड्या कंपन्यांच्या काऊंटरवर रोखीचे व्यवहार वाढले आहेत. जानेवारीमध्ये सुमारे २0 ते ३0 टक्के व्यवहार रोखीने झाल्याचे या कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले. नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात हे प्रमाण फक्त ५ ते ८ टक्के होते. १३ मार्च रोजी बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व मर्यादा उठणार आहेत. त्यानंतर रोखीचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच ४0 ते ५0 टक्क्यांवर जातील, असेही बड्या कंपन्यांकडून सांगण्यात आले.स्पेन्सर्स रिटेलचे क्षेत्र प्रमुख शाश्वत गोयंका यांनी सांगितले की, नव्या नोटा चलनात येऊ लागल्यामुळे येत्या काही महिन्यांत रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण वाढत राहील. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही हाच कल पाहत आहोत. स्पेन्सर्समध्ये नोव्हेंबरमध्ये रोख व्यवहारांचे प्रमाण ११ टक्के होते. डिसेंबरमध्ये ते २५ टक्के झाले, तर आता ते ३७ टक्क्यांवर आहे. आॅनलाईन फॅशन क्षेत्रातील किरकोळ विक्रेता कंपनी जाबोंग अँड मायंत्राचे मुख्य व्यवसाय अधिकारी राहुल तनेजा यांनी सांगितले की, नोटांबदीच्या काळात कॅश आॅन डिलिव्हरीचे प्रमाण १0 टक्क्यांवर गेले होते. ते आता पुन्हा ६0 ते ७0 टक्के झाले आहे.
रोखीचे व्यवहार येताहेत पूर्वपदावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 1:44 AM