नवी दिल्ली : पर्ल गाेल्ड ॲग्राेटेक काॅर्पाेरेशनने केलेल्या ६० हजार काेटी रुपयांच्या चिटफंड घाेटाळ्याप्रकरणी सीबीआयने ११ जणांना अटक केली आहे. देशातील हा सर्वांत माेठ्या चिटफंड घाेटाळ्यापैकी एक असून सुमारे साडेपाच काेटी गुंतवणूकदारांचे पैसे त्यात बुडाले आहेत. सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जाेशी यांनी सांगितले, की चंद्रभूषण ढिल्लाे, प्रेमनाथ, मनमाेहन महाजन, माेहनला सेजपाल, कवलजितसिंग ताेरे यासह ११ जणांना अटक केली आहे. लाेकांनी गुंतविलेल्या पैशातून संचालकांनी परदेशात मालमत्ता खरेदी केली आहे. या सर्व आराेपींनी दिल्ली, चंदीगड, काेलकाता, इत्यादी शहरांमधून अटक करण्यात आली आहे.
पर्ल ॲग्राेटेक आणि पर्ल्स गाेल्डन फाॅरेस्ट लिमिटेड या कंपन्यांची १९८२ मध्ये स्थापना करण्यात आली हाेती. शेतजमिनींचा विकास आणि विक्रीच्या नावाखाली कंपनीने हजाराे काेटी रुपये गुंतवणूकदारांकडून गाेळा केले. तब्बल १८ वर्षे कंपनीचा हा गाेरखधंदा सुरू हाेता. हा घाेटाळा १९९७ मध्ये सेबीच्या लक्षात आला. सेबीने कंपनीला ऑगस्ट २०१४ मध्ये सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले हाेते. मात्र, कंपनीने काेणाचेही पैसे दिले नाही. त्यामुळे कंपनीवर बंदी घालण्यात आली. १० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या १२ लाख ७० हजार गुंतवणूकदारांचे सुमारे ४३८ काेटी रुपये सेबीने यावर्षी परत दिले आहेत.