मुंबई: हिमालयातील अज्ञात योगीच्या इशाऱ्यावर निर्णय घेणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईतून अटक केली. यापूर्वी न्यायालयाने चित्रा रामकृष्ण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. या प्रकरणी आनंद सुब्रमण्यमला सीबीआयने यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. हिमालयात राहणाऱ्या एका अज्ञात योग्याला एनएसईशी संबंधित गोपनीय माहिती पुरवल्याबाबत चित्रा रामकृष्ण यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे.
हिमालयात राहणाऱ्या एका अज्ञात योगीला एनएसईशी संबंधित गोपनीय माहिती शेअर केल्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. आयकर विभागाने चित्रा रामकृष्ण यांच्याशी संबंधित मुंबई आणि चेन्नई येथील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. या प्रकरणी, CBI ने यापूर्वीच चित्रा यांचे कथित सल्लागार आणि NSEचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना अटक केली आहे.
पाच वर्षांत एनएसईमध्ये अनियमितता
सीबीआयनुसार, एनएसईमध्ये सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या कालावधीदरम्यान कथित अनियमितता आढळून आली होती. रवी नारायण हे मार्च २०१३ पर्यंत NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्या काळात चित्रा कंपनीच्या डेप्युटी सीईओ होत्या. चित्रा यांनी एप्रिल २०१६ मध्ये रवी नारायण यांची जागा घेतली आणि डिसेंबर २०१६ पर्यंत त्या पदावर काम करत होत्या.
दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्णय एका योगी सल्ल्यानुसार घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांना सल्ला देणारा योगी हा दुसरा तिसरा कोणी नसून, आनंद सुब्रमण्यम (सुब्बू) हाच असल्याचे समोर आले आहे. एनएसईचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या चेन्नईतील घरापासून अवघ्या १३ मीटर अंतरावर हिमालयातील योगीने बुक केलेल्या हॉटेलचे जिओटॅग छायाचित्र समोर आली आहेत. योगी आणि सुब्रमण्यम यांच्या संभाषणात वापरलेली वाक्ये यावरून हिमालयातील योगी हा आनंद सुब्रमण्यम हाच असल्याचे समोर येते. चित्रा यांच्यावर शेअर बाजारातील गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे.