केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने बुधवारी 16 नोव्हेंबर रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कथित 750.54 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात कानपूरस्थित रोटोमॅक ग्लोबल आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. रोटोमॅक ग्लोबल ही देशातील अग्रगण्य पेन उत्पादक कंपनी आहे. याशिवाय बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाकडे सुमारे 2,919 कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीमध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेचा (IOB) हिस्सा 23 टक्के आहे.
सीबीआयने कंपनी तसेच तिचे संचालक साधना कोठारी आणि राहुल कोठारी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120-बी आणि 420 व्यतिरिक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. समुहामध्ये सामील असलेल्या बँकांच्या तक्रारींच्या आधारे आधीच सीबीआय आणि ईडीच्या तपास करत आहेत.
इंडियन ओव्हरसीज बँकेने सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत कंपनीला 28 जून 2012 रोजी 500 कोटी रुपयांची नॉन-फंड लिमिट मंजूर केल्याचा आरोप केला आहे. तर, 30 जून 2016 रोजी 750.54 कोटी रुपयांची रक्कम थकवल्यानंतर खाते नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) घोषित करण्यात आले.
11 लेटर ऑफ क्रेडिट जारी
कंपनीच्या परदेशी व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 11 लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) जारी केल्याचा आरोप बँकेने केला आहे. ही सर्व लेटर डिव्हॉल्व्ह करण्यात आली होती जी 743.63 कोटी रुपयांप्रमाणे होती. बँकेने निदर्शनास आणून दिले की कंपनीने आपल्या व्यवसायासाठी कागदपत्रांचा संपूर्ण संच सादर केला नाही आणि सर्व क्रेडिट पत्रे फक्त दोन पक्षांच्या नावे जारी केली गेली.
रक्कम वसूल होणार नाही
कथितरित्या कंपनीनं बँकेची फसवणूक केली आणि पैशांची हेराफेरीही केल्याचे बँकेने म्हटले आहे. यामुळे बँकेला आर्थिक नुकसान झालं आणि कंपनीनं चुकीच्या पद्धतीने 750.54 कोटी रुपयांचा लाभ मिळवला. या रकमेची वसूली होऊ शकत नसल्याचंही बँकेने म्हटलेय.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट 'लोकमत डॉट कॉम'