राजरत्न सिरसाट, अकोलाराज्यात खरीपपूर्व व खरीप हंगामातील कापसाची मोठी आवक यावर्षी सुरू झाल्याने महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने याच पार्श्वभूमीवर हमी दराने कापूस खरेदी केंद्रे सुरू केली असून, कापसाचे चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे; पण भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) अद्याप कापूस खरेदीसंदर्भात हालचाली नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष सीसीआयच्या खरेदीकडेही लागले आहे. कापूस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने पणन महासंघाला यावर्षी ५० कोटी रुपये संरक्षित ठेव रक्कम (मार्जिन मनी) दिली असल्याने, पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहे. २०१४-१५ मागील वर्षापासून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कापूस महामंडळाने कापसाची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघाला कापसाची खरेदी करावी लागली. पणन महासंघाने गेल्यावर्षी ११५ कापूस खरेदी केंद्रांमार्फत राज्यात हमी दराने कापूस खरेदी केली आहे. यावर्षी २० खरेदी केद्रे सुरू केली आहेत.मागील वर्षी ४०५० रुपये हमीदर होते. तथापि, या दरापेक्षा कमी दराने खासगी बाजारात कापसाची खरेदी करण्यात आली. यावर्षी हमीदर ४१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या खासगी बाजारात यापेक्षा जास्त दर असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापसाची विक्री करीत आहेत; परंतु महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ व सीसीआय कापूस दरासंदर्भातील शेतकऱ्यांचे कवच असल्याने यावर्षी सीसीआय खरेदी केंद्रे उघडणार कधी, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सीसीआयचा कापूस खरेदीस विलंब!
By admin | Published: November 10, 2015 10:28 PM