राजरत्न सिरसाट, अकोलाराज्यात खरीपपूर्व व खरीप हंगामातील कापसाची आवक यावर्षी सुरू झाली असल्याने महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने हमीदराने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे; परंतु भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अद्याप कापूस खरेदीसंदर्भात करार केला नसल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारात कापसाची विक्री करावी लागत आहे.कापूस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने पणन महासंघाला यावर्षी दीडशे कोटी रुपये संरक्षित ठेव रक्कम (मार्जिन मनी) दिली असल्याने, पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. या अगोदर कापूस उत्पादक पणन महासंघाने राष्ट्रीय ग्रामीण कृषी विकास (नाफेड) महासंघाचा अभिकर्ता म्हणून २०१३-१४ पर्यंत कापसाची खरेदी केली; परंतु मागील वर्षी केंद्र शासनाने कापूस खरेदीसाठी नाफेडशी करार केला नसल्याने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कापूस महामंडळाने २०१४-१५ मध्ये कापसाची खरेदी केली. त्यामुळे सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघाला मागील वर्षी कापसाची खरेदी करावी लागली. पणन महासंघाने गतवर्षी ११५ कापूस खरेदी केंद्रांमार्फत राज्यात हमीदराने कापूस खरेदी केली आहे. दरम्यान, मागील वर्षी ४१५० रुपये हमीदर होते; तथापि या दरापेक्षा कमी दराने खासगी बाजारात कापसाची खरेदी करण्यात आली. यावर्षी हमीदर ४१०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. सध्या खासगी बाजारात यापेक्षा जास्त दर असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापसाची विक्री करीत आहेत. परंतु महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ कापूस दरासंदर्भातील शेतकऱ्यांचे कवच असल्याने यावर्षी पणन महासंघाचे केंद्र उघडणार कधी, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सीसीआयचा अद्याप पणन महासंघासोबत करार झाला नसला, तरी राज्य शासनाने परवानगी दिल्यास येत्या १५ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदी केंद्र सुरू करणार आहे.
‘सीसीआय’चा कापूस खरेदी करारास विलंब
By admin | Published: October 29, 2015 9:28 PM