Join us

Amazon, Flipkart सह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा दणका, महत्त्वाच्या नियमांकडे केले दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:00 AM

CCPA issues notice to e-commerce sites : ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, सीसीपीएने या प्रकरणी स्वतःहून दखल घेत कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली :  Amazon, Flipkart आणि Paytm मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना आणि काही विक्रेत्यांना भारतीय मानक ब्युरो (BIS) मानकांची पूर्तता न करणारे प्रेशर कुकर विकल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने (CCPA) नोटीस पाठवली आहे.

सीसीपीएने 18 नोव्हेंबर रोजी या ई-कॉमर्स कंपन्या आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रेशर कुकर ऑफर करणाऱ्या विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर BIS मानकांची पूर्तता न करणारे कुकर विकल्याचा आरोप आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, सीसीपीएने या प्रकरणी स्वतःहून दखल घेत कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

सीसीपीएने देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने सदोष गुणवत्तेच्या बनावट उत्पादनांविरुद्ध देशव्यापी मोहीम चालवली आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले की, ई-कॉमर्स कंपनी मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने कशी विकू शकते. अशा कंपन्यांनी मानकांची पूर्तता केल्यानंतरच विक्रेत्यांना प्लॅटफॉर्मवर उत्पादने विकण्याची परवानगी द्यावी. त्यांनी आपला व्यवसाय जबाबदारीने चालवला पाहिजे.

बनावट उत्पादनांविरुद्ध मोहीमयाबाबत सीसीपीएने सर्व जिल्ह्यांना यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर उत्पादनाची विक्री आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, असे म्हटले आहे. तसेच, ग्राहकांना जागरूक करण्यासाठी आणि ग्राहकांना ISI दर्जेदार उत्पादने खरेदी करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अनेक मोहिमा देखील चालवल्या आहेत, असे सीसीपीएने म्हटले आहे.

टॅग्स :फ्लिपकार्टअ‍ॅमेझॉनव्यवसाय