Join us  

Ceigall India Limited : सीगल इंडियाच्या शेअरची ४.५% प्रीमिअमवर लिस्टिंग; काही वेळातच शेअरमध्ये घसरण, काय करते कंपनी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 1:28 PM

Ceigall India Limited : हा आयपीओ १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. हा आयपीओ तीन दिवसांत १४.०१ पट सब्सक्राइब झाला होता.

राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) सीगल्स इंडिया लिमिटेडचा शेअर (Ceigall India ltd Share Price) इश्यू प्राइसच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी वधारून ४१९ रुपयांवर लिस्ट (Ceigall Listing Price) झाला. मुंबई शेअर बाजारात (BSE) हा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वधारून ४१३ रुपयांवर लिस्ट झाला. या आयपीओची (Ceigall India IPO) इश्यू प्राइस ४०१ रुपये होती. हा आयपीओ १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता.

हा आयपीओ तीन दिवसांत १४.०१ पट सब्सक्राइब झाला. रिटेल कॅटेगरीमध्ये ३.८२ पट, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) ३१.२६ पट आणि नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) कॅटेगरीला १४.८३ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. लिस्टिंग नंतर मात्र या शेअरमध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. लिस्टिंगनंतर काही वेळातच हा शेअर ४०१ रुपयांवर पोहोचला.

₹१,२५२.६६ कोटी रुपयांचा होता इश्यू

सीगल इंडिया लिमिटेडचा इश्यू १,२५२.६६ कोटी रुपयांचा होता. यासाठी कंपनीनं ६८४.२५ कोटी रुपयांचे १७,०६३,६४० नवे शेअर्स जारी केले होते. तर कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल अर्थात ओएफएसच्या माध्यमातून ५६८.४१ कोटी रुपयांचे १४,१७४,८४० शेअर्स विकत आहेत.किरकोळ गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त ४८१ शेअर्ससाठी बोली लावता येणार होती.

सीगल इंडिया लिमिटेडने इश्यूचा प्राईज बँड ३८० ते ४०१ रुपये निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच ३७ शेअर्ससाठी बोली लावू शकणार होते. जर तुम्हाला ४०१ रुपयांच्या आयपीओच्या अप्पर प्राइस बँडवर १ लॉटसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला १४,८३७ रुपये गुंतवावे लागले असते. तर, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉट म्हणजेच ४८१ शेअर्ससाठी अर्ज करू शकणार होते. 

काय करते कंपनी?

ही कंपनी २००२ मध्ये स्थापन झाली असून पायाभूत सुविधा बांधकाम कंपनी आहे. ही कंपनी एलिव्हेटेड रोड, उड्डाणपूल, पूल, रेल्वे ओव्हरपास, बोगदे, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांसह इतर पायाभूत सुविधांच्या बांधकामात गुंतलेली आहे.

(टीप : यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूकशेअर बाजार