शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशी
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला जनतेचा कौल, तसेच सकारात्मक आंतरराष्ट्रीय वातावरणामुळे नाताळ सणाच्या आधीच दलाल स्ट्रीटवर नाताळ साजरा झाल्याचे दिसून आले. सप्ताहामध्ये जवळपास सर्वच प्रमुख निर्देशांकांनी आपले नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत. परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या विक्रीनंतरही बाजारामध्ये तेजीचे वारे वाहात असल्याचे दलाल स्ट्रीटवर बघावयास मिळाले.
सोमवारी बाजार काहीसा मंदीच्या वातावणामध्ये सुरू झाला. मात्र, भाजपाला गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळत असल्याचे दिसताच, बाजारातील वातावरण बदलले आणि तेथे तेजीचा संचार झाला. सप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ३३९६४.२८ अशा सर्वाधिक उंचीपासून ३२५९५.६३ अंशांदरम्यान झोके घेतले. सप्ताहाअखेरीस तो ३३९४०.३० अंश अशा नव्या उच्चांकावर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ४७७.३३ अंश म्हणजेच १.४३ टक्के वाढ झाली. वाढीचा हा सलग तिसरा सप्ताह आहे.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)नेही सप्ताहात नवा उच्चांक केला. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या विक्रीमुळे त्याला १०५०० अंशांची पातळी राखता आली नाही. सप्ताहात निफ्टी १५८.८० अंश म्हणजेच, १.५५ टक्के वाढून १०४८५.४५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांकही जोरात राहून नवीन उच्चांक प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले. या निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ५९९.०६ अंश (३.५३ टक्के) आणि ८२०.५५ अंश (४.५२ टक्के) अशी वाढ झाली. परकीय वित्तसंस्थांनी सप्ताहामध्ये ३८०५.३१ कोटींची विक्री केल्याचे सेबीने जाहीर केले आहे.
अमेरिकेने मंजूर केलेले कर सुधारणा विधेयक, अमेरिकन अर्थव्यवस्थेची होत असलेली वृद्धी, जपानने कायम राखलेले व्याजदर यामुळे आंतरराष्टÑीय बाजारांमधील वातावरणही सकारात्मक राहिले. त्याचाही अनुकूल प्रभाव भारताच्या शेअर बाजारात दिसून आला.
नाताळाआधीच उत्सव; निर्देशांक आणखी उंचावर
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला जनतेचा कौल, तसेच सकारात्मक आंतरराष्ट्रीय वातावरणामुळे नाताळ सणाच्या आधीच दलाल स्ट्रीटवर नाताळ साजरा झाल्याचे दिसून आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:51 AM2017-12-25T01:51:20+5:302017-12-25T01:51:31+5:30