Lokmat Money > बिझनेस न्यूज > विस्तारासाठी सेलो कंपनीकडे मुबलक भांडवल- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठोड

विस्तारासाठी सेलो कंपनीकडे मुबलक भांडवल- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठोड

१,९०० कोटींची उभारणी; राजस्थानमध्ये लवकरच नवा कारखाना

By मनोज गडनीस | Published: November 1, 2023 10:30 AM2023-11-01T10:30:33+5:302023-11-01T10:32:36+5:30

१,९०० कोटींची उभारणी; राजस्थानमध्ये लवकरच नवा कारखाना

Cello Company has ample capital for expansion - Chairman and Managing Director Pradeep Rathod | विस्तारासाठी सेलो कंपनीकडे मुबलक भांडवल- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठोड

विस्तारासाठी सेलो कंपनीकडे मुबलक भांडवल- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठोड

मनाेज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गृहोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य असलेल्या सेलो कंपनीची भांडवली स्थिती उत्तम असून कंपनीला विस्तारासाठी नव्या भांडवलाची तूर्तास गरज नसल्याचे मत सेलो कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीची प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती १ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कंपनीमध्ये प्रवर्तक व कुटुंबीयांची हिस्सेदारी ९२ टक्के असून त्यांपैकी १३.८ टक्क्यांची भागविक्री होत आहे. या अंतर्गत एकूण १,९०० कोटी रुपयांची भागविक्री होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्राथमिक समभाग विक्रीच्या पार्श्वभूमीवर प्रदीप राठोड यांनी ‘लोकमत’शी विशेष बातचीत केली. या समभाग विक्रीचे वैशिष्ट्य विशद करताना प्रदीप राठोड यांनी सांगितले की, मुळामध्ये आता जी भागविक्री होत आहे, त्यामध्ये कंपनीचे प्रवर्तक व कुटुंबीयांकडे असलेल्या हिस्सेदारीची विक्री करण्यात येत आहे. या भागविक्रीअंतर्गत मिळणारा पैसा हा कंपनीकडे जाणार नसून, तिच्या प्रवर्तकांना व कुटुंबीयांना मिळणार आहे.  ज्यावेळी कंपनीने भागविक्रीची घोषणा केली होती, त्यावेळी ही रक्कम १७५० कोटी रुपये इतकी होती. मात्र, कंपनीच्या समभागांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे या विक्रीची टक्केवारी वाढविण्यात आली आहे. पाच रुपये दर्शनीमूल्य असलेल्या कंपनीच्या समभागांची विक्री ६१७ रुपये ते ६४८ रुपयांच्या दरम्यान केली जात आहे. या भागविक्रीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यापैकी १० कोटी रुपये मूल्याचे समभाग हे कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

स्टेशनरी, काच उद्योग आणि फर्निचर अशा तीन क्षेत्रांमध्ये कंपनी कार्यरत असून या तिन्ही क्षेत्रांमध्ये कंपनीची बाजारातील हिस्सेदारी लक्षणीय आहे. विशेष म्हणजे, दैनंदिन वापराच्या काचेच्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये कंपनीने काही वर्षांपूूर्वीच प्रवेश केला. त्यावेळी काचेच्या वस्तूंचे देशातील मार्केट हे ३५० कोटी रुपयांच्या दरम्यान वार्षिक उलाढाल करत होते. मात्र, कंपनीच्या प्रवेशानंतर व ज्या पद्धतीने कंपनीने वैविध्यपूर्ण उत्पादनांची मांडणी केली, ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून, यामुळे काचेच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या बाजारपेठेने आता वार्षिक उलाढालीचा आकडा एक हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे, असे ते म्हणाले.

महसुलाचे प्रमाण १६ टक्के

आजच्या घडीला या तीन क्षेत्रांतून कंपनी जो व्यवसाय करते त्यापैकी ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उलाढालीतून कंपनीला एकूण ६५ टक्के महसूल मिळतो तर मॉड्युल्ड फर्निचर उद्योगातून कंपनीला १८ टक्के महसूल मिळतो. त्याखेरीज स्टेशनरी विशेषतः लेखणी उद्योगातून कंपनीला मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण हे १६ टक्के इतके आहे. 

राजस्थानमध्ये लवकरच नवा कारखाना

सध्या कंपनीचे पाच राज्यांत एकूण १३ कारखाने कार्यरत आहेत. दमण, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, प. बंगाल येथे हे कारखाने असून लवकरच राजस्थान येथे कंपनी एक विस्तीर्ण प्रकल्प उभारत आहे. मार्च २०२४ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे, असे राठाेड म्हणाले.

Web Title: Cello Company has ample capital for expansion - Chairman and Managing Director Pradeep Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.