नवी दिल्ली : कच्च्या मालाच्या दरात ५० टक्के कपात झालेली असतानाही सिमेंट कंपन्यांनी मागील वर्षभरात सिमेंटच्या दरात २० टक्के वाढ केली आहे. विशेष म्हणजे कच्चा माल महाग झाला, असे म्हणत कंपन्यांनी सिमेंटचे दर वाढवले आहेत. मागील एका महिन्यात तब्बल १३ टक्के भाववाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या अनेक भागांत सिमेंटच्या ५० किलोच्या गोणीची किंमत ४०० रुपये झाली आहे. काही ठिकाणी गोणीचा दर ३८२ रुपये आहे. यामुळे साधारण आकाराचे घर बांधण्यासाठी येणारा सिमेंटचा खर्च सरासरी ३३ हजार रुपयांनी वाढला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी दिसत आहे.
सिमेंट उत्पादनासाठी कोळसा आणि पेटकोकप्रमुख कच्चा माल आहे. त्यांची आयात महागल्यामुळे दर वाढविण्यात आल्याचे सिमेंट कंपन्यांनी म्हटले आहे. वास्तविक यांचे दर मागील वर्षभरात ५० टक्के कमी झाले आहेत. सिमेंटची गोणी मात्र ६५ रुपयांनी म्हणजेच सुमारे २० टक्के महागली आहे.
नफा १८% वाढला
जुलै-सप्टेंबरमध्ये कंपन्यांचा नफा १८ टक्के वाढला. ‘मोतीलाल ओसवाल’च्या अहवालानुसार, वर्षभरात कंपन्यांची प्रतिटन कमाई ८०८ रुपयांवरून ९०५ रुपये झाली. पेटकोकची किंमत गेल्या वर्षी ६१ हजार रुपये टन होती, ती यंदा २४ टक्के कमी आहे.
पारदर्शकता गरजेची
रिअल इस्टेट विकासकांची संस्था ‘क्रेडाई’चे माजी अध्यक्ष सतीश मगर म्हणाले की, मागणी वाढूनही कंपन्या उत्पादन वाढवत नाहीत. कंपन्यांच्या कामात पारदर्शकता आणायला हवी. औद्योगिक उत्पादकता ७६% असताना सिमेंट कंपन्या ६५ टक्केच उत्पादन क्षमता वापरत आहेत.