नवी दिल्ली : युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका उडालेला असतानाच आता सिमेंटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कोळसा आणि पेट कोक यांसारख्या कच्चा मालाच्या भाववाढीमुळे पुढील महिनाभरात सिमेंटचे दर ६ ते १३ टक्क्यांनी वाढून प्रति गोणी ४०० रुपयांच्यावर जातील, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
सिमेंट उद्योजकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील ६ महिन्यांत सिमेंटचे दर ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. क्रिसिलच्या एका अहवालानुसार, एका वर्षात सिमेंटचे दर वाढून प्रतिबॅग ३९० रुपये झाले आहेत. पुढील महिनाभरात सिमेंट आणखी २५ ते ५० रुपयांनी महाग होऊ शकते.
एका मोठ्या सिमेंट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकी पेट कोक गतवर्षी ९६ टक्क्यांनी महागले. स्वदेशी पेट कोकचे दर मार्चमध्ये २६ टक्क्यांनी वाढले. चालू महिन्यातही आतापर्यंत २१ टक्के वाढ झाली आहे. सागरी मार्गावरील मालवाहतूक महागल्यामुळे आयात कोकचे दर दुपटीने वाढून ९,९५१ रुपये प्रतिटन झाले आहेत. त्यामुळे सिमेंटचे दर वाढविल्याशिवाय दुसरा पर्यायच आमच्यासमोर नाही.
कच्चा माल महागला
क्लिंकर हा सिमेंटचा मुख्य कच्चा माल असून त्याच्या उत्पादनासाठी कोळसा आणि पेट कोक आवश्यक आहे. या सर्वांचेच दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे समस्येत आणखीच भर पडली आहे. पॅकेजिंग वस्तू आणि वाहतूक व वितरण यांचा खर्चही वाढला आहे. गेल्या वित्त वर्षांत ब्रेंट क्रुडचे दर ७५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे जानेवारी-मार्च तिमाहीत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट कोकच्या दरातही सरासरी ४३ टक्के वाढ झाली आहे.