संजय खांडेकर
अकोला : कोरोनाच्या लॉकडाउनमधून अद्याप मुक्तता झाली नाही तोच सर्व सिमेंट कंपन्यांनी मे महिन्यापासून गोणीमागे ४० रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३५८ रुपयाला मिळणारी नामांकित कंपनीची सिमेंटची गोणी आता वाहतूक खर्चासह चारशे रुपयांच्या घरात जाणार आहे. राज्यभरातील वितरकांना तशा सूचना देण्यात आल्या असून, मे महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याचे संकेत आहेत.
नोटाबंदी, जीएसटीमुळे बांधकाम व्यावसायिकांवर संकट कोसळले होते. त्यात कोरोना आल्याने बांधकाम व्यावसायिकांचा व्यवसाय विस्कळीत झाला आहे. दरम्यान सिमेंट कंपन्यांनी लॉकडाउन उठण्याआधीचं सिमेंटमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने बांधकाम व्यावसायिकांसह वितरक हादरले आहे.
अंबुजा, अल्ट्राटेक, एसीसी, बिर्ला ए-१ या नामांकित कंपनीची सिमेंटची गोणी लॉकडाउन आधी ३५० ते ३५८ रुपयांपर्यंत विक्र ीसाठी होती. सोबतच आंध्र-तेलंगणाकडील डेक्कन, रामको, सागर, महा या सिमेंट कंपनीची गोणी २९० ते ३१० रुपयांपर्यंत विक्र ीसाठी होती. या सर्व सिमेंट कंपन्यांंनी १ मेपासून प्रत्येक सिमेंट गोणी मागे ४० रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंबुजा कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्कसाधला असता, त्यांना याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश आले नसल्याचे सांगितले. एसीसी आणि अंबुजा या दोन सिमेंट कंपन्यांनी ट्रक भाड्यात २० टक्के कपात केल्याने वाहतूक व्यावसायिकांनी देखील काम करण्यास नकार दिला आहे.
>बांधकाम व्यावसायात मंदी आल्याने आधीच सिमेंटची मागणी कमी झाली आहे. अशात वर्षभरात दुसऱ्यांदा सिमेंटची दरवाढ करण्याचा प्रयत्न सिमेंट कंपन्यांनी चालविला आहे. कंपन्यांच्या या हेकेखोरीवर शासनाने लगाम घालण्याची गरज आहे. क्रेडाईतर्फे मागेच याबाबतचे निवेदन शासनाला देण्यात आले आहे. आतातरी याबाबत कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.
- पंकज कोठारी, माजी उपाध्यक्ष, क्रेडाई, महाराष्टÑ राज्य
पुढील महिन्यात होणार सिमेंटची दरवाढ
राज्यभरातील वितरकांना तशा सूचना देण्यात आल्या असून, मे महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याचे संकेत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:27 AM2020-04-30T03:27:39+5:302020-04-30T03:27:51+5:30