नवी दिल्ली : डाळींच्या किमती आकाशाला भिडल्या असतानाच केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नाफेड आणि एसएफएसीमार्फत बफर स्टॉकसाठी ४० हजार टन डाळींची खरेदी सुरू करणार आहे.बाजारात तुरीच्या डाळींचा भाव २१० रुपये प्रतिकिलो झाला आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारही करण्यात आला. त्यातच आवश्यकता पडल्यास बफर स्टॉकसाठी डाळींची आयातही केली जाऊ शकते, असे सांगण्यात आले होते.डाळींचा तुटवडा निर्माण झाल्याने यावेळी आतापर्यंत पाच हजार टन डाळींची आयात करण्यात आली आहे. ही डाळ राज्यांना वितरित करण्यात येत आहे. याशिवाय ३ हजार टन डाळ आयात करण्यात येणार आहे. राष्ट्रीय राजधानीत आयात तूर डाळीला केंद्रीय भांडार आणि सफल यांच्या ५०० विक्री केंद्रांवर १२० रुपये प्रतिकिलो सबसिडी दराने विकली जाणार आहे.कृषी सचिव सिराज हुसैन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून डाळी खरेदी करतानाच आवश्यकता पडल्यास त्यासाठी डाळींची आयात केली जाईल. प्रमुख डाळ उत्पादक जिल्ह्यातून थेट शेतकऱ्यांकडूनच तूर, हरभरा आणि उडदासह अन्य डाळींची खरेदी केली जाईल. केंद्र सरकारकडून नाफेड, भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) आणि एसएफएसी या तीन संस्था डाळींची खरेदी करतील. नाफेडद्वारे ३० हजार टन, एसएफएसीद्वारे १० हजार टन डाळींची खरेदी केली जाईल. ही खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.खराब हवामान : उत्पादन २० लाख टनांनी घटले...उत्तर प्रदेशात कानपूर जिल्हा प्रशासन स्थानिक व्यापाऱ्यांच्या मदतीने १३५ रुपये प्रतिकिलो दराने तूरडाळ विकणार आहे. त्याची उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी कौशलराज शर्मा यांनी कानपुरात सांगितले.डाळींचे भाव गगनाला भिडल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी साठेबाज आणि काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली असून दोन दिवसांत १० राज्यात ३५ हजार टन डाळ जप्त करण्यात आली. खराब हवामानामुळे २०१४-१५ मध्ये डाळींच्या उत्पादनात २० लाख टनांनी घट झाली होती.
केंद्र करणार डाळींचा बफर स्टॉक
By admin | Published: October 23, 2015 2:53 AM