ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - सरकारी बँकांना 5000 कोटी रुपयांचे भांडवल पुरवण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे या बँकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल असा अंदाज आहे. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या म्हणजे सध्या सुरू असलेल्या तिमाहीत ही रक्कम मिळेल असा अंदाज आहे.
येत्या बजेटमध्ये संसदेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सदर रक्कम बँकांमध्ये गुंतवण्यात येईल असे सरकारी अधिका-यांनी सांगितले. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सरकारी बँकांमध्ये येत्या काही वर्षांमध्ये 70 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली होती. आता त्यात आणखी 50 हजार कोटींची वाढ करण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आणि एकूण गुंतवणूक 1.10 लाख कोटी रुपयांची होईल असा अंदाज आहे.
2015 - 16 या आर्थिक वर्षात सरकारी बँकांमध्ये 25 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याचे लक्ष्य होते, यापैकी 20,088 कोटी रुपयांची गुंतवणूक आत्तापर्यंत करण्यात आली आहे. बँकांनी देशाच्या कानाकोप-यात पोचावे तसेच, इंटरनेट कनेक्टिव्हिटी जास्तीत जास्त ठिकाणी द्यावी यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.