Join us

केंद्रीय महागाई भत्ता भविष्यलक्षी प्रभावाने १ जुलैपासून दिला जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 6:13 AM

DA : पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्ता दिला गेल्यास त्यासोबत कर्मचाऱ्यास थकीत भत्त्याच्या फरकाची रक्कम मिळू शकते. तथापि, भविष्यलक्षी प्रभावाने भत्ता दिला गेल्यास फरकाच्या रकमेचा प्रश्नच निर्माण होत नाही.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने देण्याऐवजी भविष्यलक्षी प्रभावाने १ जुलैपासून दिला जाण्याची शक्यता आहे, असे वित्त मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्ता दिला गेल्यास त्यासोबत कर्मचाऱ्यास थकीत भत्त्याच्या फरकाची रक्कम मिळू शकते. तथापि, भविष्यलक्षी प्रभावाने भत्ता दिला गेल्यास फरकाच्या रकमेचा प्रश्नच निर्माण होत नाही.सूत्रांनी सांगितले की, येत्या ३० जून रोजी भत्त्याचे खर्च निर्देशन (कॉस्ट इंडेक्सेशन) होईल. त्याचा वाढीव दर सुमारे २८ टक्के असेल. निर्देशनावर सर्व काही अवलंबून असेल. कारण महागाई भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने दिला जाऊ शकत नाही.प्राप्त माहितीनुसार, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. जुलै २०१९ पासून तो लागू झालेला आहे. जानेवारी २०२० मध्ये त्यात पहिली सुधारणा होणे आवश्यक होते. तथापि, कोरोना-१९ साथीमुळे भत्त्यातील वाढ सरकारने रोखून धरली आहे. त्यामुळे सुधारणा झालीच नाही. त्यानंतरच्या सगळ्याच देय सुधारणा सरकारने रोखल्या. या महिन्यात त्यासंबंधीचा निर्णय होणार असला तरी तो पूर्वलक्षी प्रभावाने  मिळण्याची शक्यता नसल्यामुळे जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीतील देय वाढीवर कर्मचाऱ्यांना पाणी सोडावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी सांगितले की, महागाई भत्त्याचे तीन वाढीव देय हप्ते सरकारने गोठविले आहेत. १ जानेवारी २०२०, १ जलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ हे ते तीन हप्ते होत. कोविड-१९ मुळे गोठविण्यात आलेले वाढीव देय हप्ते आपल्याला पूर्वलक्षी प्रभावाने मिळतील, अशी आशा केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना होती. तथापि, ती धुळीस मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :कर्मचारीपैसा