नवी दिल्ली - दसरा आणि दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचा लाभ रेल्वेमधील १२ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. मात्र रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे रेल्वेवर २ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. दरवर्षी दसऱ्याला रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. मात्र त्यात राजपत्रित अधिकाऱ्यांचा समावेश केला जात नाही. तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स यांचा समावेश केला जात नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोनसच्या स्वरूपात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यात १८ हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा होऊ शकते. सलग सातव्या वर्षी रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर, ७८ दिवसांचा बोनस जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 3:22 PM