केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरीसंदर्भात सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन नाही, असे सरकारने म्हटले आहे. आतापर्यंत, 8वा केंद्रीय वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार रिव्हाइज होतील आणि डीएसह इतर सुविधाही मिळतील, असे मानले जात होते.
महत्वाचे म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 7वा केंद्रीय वेतन आयोग लागू आहे आणि यानुसारच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सॅलरी अथवा डीए आदी सुविधा मिळत आहेत.
काय म्हणालं सरकार -
खरे तर, यासंदर्भात लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता, की, केंद्र सरकार आपल्या कर्मचार्यांसाठी 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाची वेळेवर स्थापना करण्यासंदर्भात काही प्रस्ताव ठेवणार आहे? यावर उत्तर देतांना केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी, असा कुठलाही प्रस्ताव नाही, असे म्हटले आहे.
1947 पासून एकूण सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार दर 10 वर्षांनंतर वेतन आयोग स्थापन करत असते. भारतातील पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये स्थापन करण्यात आला होता. वेतन आयोगाची संवैधानिक रचना ही अर्थ मंत्रालयांतर्गत येते.