Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्र सरकारने केली दहा बँक प्रमुखांची नेमणूक

केंद्र सरकारने केली दहा बँक प्रमुखांची नेमणूक

सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या प्रमुखांची नेमणूक केंद्र सरकारने केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 03:56 AM2018-09-21T03:56:45+5:302018-09-21T03:56:55+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या प्रमुखांची नेमणूक केंद्र सरकारने केली आहे.

The central government has appointed ten bank chiefs | केंद्र सरकारने केली दहा बँक प्रमुखांची नेमणूक

केंद्र सरकारने केली दहा बँक प्रमुखांची नेमणूक

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या प्रमुखांची नेमणूक केंद्र सरकारने केली आहे. स्टेट बँक आॅफ इंडियामधून (एसबीआय) पाच नेमणुका झाल्या आहेत. यापैकी अनेक जागा सुमारे आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून रिक्त होत्या.
एसबीआयचे उप-व्यवस्थापकीय संचालक करणाम सेकर यांची देना बँकेच्या प्रमुखपदी नेमणूक झाली आहे. देना बँक, बँक आॅफ बडोदा आणि विजया बँक यांचे विलीनीकरण करण्याची सरकारची योजना आहे. दिल्लीत मुख्यालय असलेल्या पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओपदी परंपरा मोडून पहिल्यांदाच बिगर शीख व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. आयआयएम बंगळुरूचे प्रोफेसर चरण सिंग यांची बँकेच्या चेअरमनपदी, तर अलाहाबाद बँकेचे कार्यकारी संचालक एस. हरी शंकर यांची व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.
इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक ए. एस. राजीव यांची बँक आॅफ महाराष्ट्राच्या एमडी व सीईओपदी तर युनियन बँकेचे ईडी अतुल गोयल यांची युको बँकेच्या एमडी व सीईओपदी नेमणूक करण्यात आली आहे. राजीव आणि गोयल हे तुलनेने तरुण असून, त्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त काळ या पदावर काम करता येणार आहे.
एसबीआयच्या पाच उप-व्यवस्थापकीय संचालकांची राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखपदी नेमणूक करून सरकारने उपलब्ध सर्वोत्तम गुणवत्तेला प्राधान्य देऊन बँक सुधारणा कार्यक्रम राबविण्याचे धोरण स्वीकारल्याचे संकेत दिले आहेत. या धोरणानुसार मृत्युंजय महापात्रा सिंडिकेट बँकेत, पद्मजा चंद्रू यांना इंडियन बँकेत, पल्लव मोहापात्रा यांना सेंट्रल बँकेत आणि जे. पाकिरीसामी यांना आंध्र बँकेत प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. सिंडिकेट बँकेचे ईडी एस. एस. मल्लिकार्जुन राव यांना अलाहाबाद बँकेचे एमडी व सीईओ करण्यात आले. अशोककुमार प्रधान यांना युनायटेड बँकेतच ईडी पदावर पदोन्नत करण्यात आले आहे.
>वित्तमंत्री घेणार लवकरच बैठक
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हे येत्या २५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. वार्षिक वित्तीय कामगिरी आढाव्याचा भाग म्हणून ही बैठक होईल. अनुत्पादक भांडवलाचे प्रमाण कमी करण्यासह अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: The central government has appointed ten bank chiefs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.