Join us

वैद्यकीय उपकरणांवरील नफ्यावर मर्यादा आणणार, प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:00 AM

वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर सरकारने मर्यादा घातल्यामुळे अडचणीत आलेल्या उत्पादक कंपन्यांना दिलासा देण्यासाठी आता सरकार या उपकरणांच्या विक्रीवर वितरक आणि किरकोळ विक्रेते यांना मिळणा-या नफ्यावर मर्यादा घालणार आहे.

नवी दिल्ली : वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर सरकारने मर्यादा घातल्यामुळे अडचणीत आलेल्या उत्पादक कंपन्यांना दिलासा देण्यासाठी आता सरकार या उपकरणांच्या विक्रीवर वितरक आणि किरकोळ विक्रेते यांना मिळणा-या नफ्यावर मर्यादा घालणार आहे.औषधनिर्माण विभागाने वैद्यकीय उपकरणांच्या श्रेणी ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी वैद्यकीय उपकरण महासंघ, आरोग्य उद्योग क्षेत्रातील संघटना आणि संबंधित नियामक संस्था यांची मदत मागण्यात आली आहे. विभागाचे सचिव २५ आॅक्टोबर रोजी एक बैठक घेणार असून, त्यात व्यावसायिक नफ्याची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते. बैठकीसंबंधीचे पत्र सर्व संबंधितांना पाठविण्यात आले आहे.पत्रात म्हटले आहे की, औषधनिर्माण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक १६ आॅक्टोबर रोजी आधीच झाली आहे. व्यावसायिकांना किती नफा कमावण्याची परवानगी असावी, यावर बैठकीत चर्चा झाली. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी एक कार्यशाळा घेण्याचे बैठकीत ठरले. राष्ट्रीय औषधी किंमत निर्धारण प्राधिकरण २३ वैद्यकीय उपकरणांच्या व्यावसायिक किमती सादर करणार आहे. याशिवाय या उद्योग क्षेत्राकडूनही योग्य तो डाटा सादर केला जाईल.औषधनिर्माण सचिव जय प्रिय प्रकाश तसेच राष्ट्रीय औषधी किंमत निर्धारण प्राधिकरणाचे चेअरमन भूपेंद्र सिंग यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. तथापि, सरकारी सूत्रांनी सांगितले की, याविषयावरील कार्यशाळा सुरू आहे. हृदयाचे स्टेंटस् आणि गुडघा रोपकांसह काही वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण आणल्यानंतर आणखी काही उपकरणे या यादीत समाविष्ट केली जाऊ शकतात, अशी चर्चा होती. त्यातच आता सरकारने व्यावसायिक नफ्यावर नियंत्रण आणण्याचे प्रस्तावित केले आहे.उत्पादनानंतर किती वाढणार किंमत?वैद्यकीय उपकरणांच्या २३ पैकी १९ श्रेणींतील उपकरणे किंमत नियंत्रणातून वगळण्यात आली आहेत. सिरिंजपासून हार्ट व्हाल्व्हपर्यंतच्या वस्तू त्यात आहेत.अस्थिरोपणातील फक्त गुडघा रोपक किंमत नियंत्रणात आहेत. आयात अथवा उत्पादनानंतर उपकरणाची किंमत किती वाढविता येईल, याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.

टॅग्स :डॉक्टर