नवी दिल्ली: केंद्र सरकारनेपेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्का(एक्साइज ड्युटी)त वाढ केली आहे. सरकारच्या आदेशानुसार पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेसच्या स्वरूपात प्रतिलिटर आठ रुपये आकारले जातील. त्याचबरोबर विशेष अतिरिक्त शुल्क म्हणून पेट्रोलवर प्रतिलिटर 2 रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर 5 रुपये द्यावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेल किमतीवर अनुक्रमे 10 आणि 13 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 6 मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही.
तेल कंपनीच्या अधिका-याने सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलची एमआरपी जशीच्या तशीच राहील. कोरोनाच्या महारोगराईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडील काळात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांनी किमतीत सातत्यानं घसरण सुरूच ठेवली होती. ही वाढ पूर्णपणे अतिरिक्त अबकारी शुल्काच्या स्वरुपात असल्याने त्याचा महसूल केंद्र सरकारला प्राप्त होईल.
दिल्लीत पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये वाढ
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट वाढविण्यात आल्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. डिझेलवरील व्हॅटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने हे दर भडकले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलवर असलेला व्हॅट २७ टक्क्यांवरून ३० टक्के वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर डिझेलवर आता ३० टक्के व्हॅट आकारला जाणार आहे. आतापर्यंत डिझेलवर १६.५ टक्के व्हॅट होता. तो आता जवळपास दुप्पट केला गेला आहे. यामुळे आता दिल्लीमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती प्रतिलिटर अनुक्रमे ७१.२६ आणि ६९.३९ रुपये असतील. दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी खजिन्यामध्ये दरवर्षी ९०० कोटींची वाढ होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी रात्री दिल्ली सरकारने मद्यावर ७० टक्के कोरोना टॅक्स लावला होता. यामुळेही सरकारी खजिन्यात भर पडणार आहे.