नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) मालकीच्या १३ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून ३१ मार्चपूर्वी यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
‘एएआय’चे अध्यक्ष संजीवकुमार यांनी सांगितले, आम्ही विमान वाहतूक मंत्रालयाला १३ विमानतळांची यादी पाठविली आहे. त्यांच्यासाठी सरकारी-खासगी भागीदारी तत्त्वावर बोली लावली जाईल. चालू वित्त वर्षाच्या अखेरपर्यंत बोली प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे. १३ विमानतळांपैकी भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, त्रिची, इंदौर आणि रायपूर हे सहा विमानतळ मोठे आहेत.
झारसुगुडा, गया, कुशीनगर, कांगडा, तिरुपती, जबलपूर आणि जळगाव हे सात विमानतळ छोटे आहेत. मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी छोट्या विमानतळांना मोठ्यांशी जोडण्यात येईल. यात झारसुगुडा विमानतळ भुवनेश्वरशी, कुशीनगर व गया विमानतळ वाराणसीशी, कांगडा अमृतसरला, जबलपूरला इंदूरशी, जळगावला रायपूरशी आणि तिरूपतीला त्रिचीशी जोडले जाईल.