नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसींचा तुडवडा जाणवत असल्याची तक्रार अनेक राज्यांतून करण्यात येत आहे. कोरोना लसीअभावी देशातील अनेक ठिकाणचे लसीकरण बंद पडल्याचीही माहिती मिळाली होती. आता मात्र, कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याचा तयारी आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (SII) ३ हजार कोटी आणि भारत बायोटेकला (Bharat Biotech) दीड हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती 'रॉयटर्स' या वृतसंस्थेकडून देण्यात आली आहे. (central govt to be approved rupees 4 thousand 500 crore credit to serum institute and bharat biotech)
कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ३ हजार कोटींच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता. हा प्रस्ताव सरकारकडून लवकरच मान्य होईल, असे सांगितले जात आहे. सीरमने 'एस्ट्राजेनका कोव्हिड-१९' या लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. देशांतर्गत लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
सीरमकडून एस्ट्राजेनकाच्या लसीचे उत्पादन
एस्ट्राजेनकाच्या लसीचे उत्पादन सीरमकडून करण्यात येते. भारतात ही लस कोव्हिशिल्ड नावाने उपलब्ध आहे. देशात लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते सरकार करेल, असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. अर्थ खात्याकडून सीरमला ३ हजार कोटी आणि भारत बायोटेकला १,५०० कोटींचे अर्थसहाय्य केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आताच्या घडीला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे. प्रत्येक महिन्याला ७ कोटी लसींचे उत्पादन सीरममध्ये करण्यात येत आहे. कंपनीने दरमहा १० कोटींहूनअधिक लसींच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवले असून, त्यासाठी कंपनीने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. भारतात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. आतापर्यंत १२ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.