नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य देशवासींसाठी चांगली बातमी आहे. दिवाळीपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने देशातील गुंतवणूकदारांना फेस्टिव्हल गिफ्ट दिले असून, PPFसह अनेक बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आता या योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ (Interest Rates Increased) करण्यात आली असून, आता नवीन व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत.
आपल्या देशातील लोकं मोठ्या प्रमाणात छोट्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. सुकन्या समृद्धी योजना, PPF आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. सरकार दर तीन महिन्यांनी या लहान बचत योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेते. सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी या योजनांवर नवीन दर जाहीर केले. सरकारने काही लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
रेपो दरवाढीमुळे ठेवींवरील व्याजदर वाढवले
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे ठेवींवरील व्याजदर वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. तथापि, पगारदार लोकांमध्ये लोकप्रिय असलेली बचत योजना पीपीएफवरील व्याजदर ७.१ टक्के कायम ठेवण्यात आला आहे. नवीन दरांनुसार, पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या ठेवीवर आता ५.८ टक्के व्याज मिळेल. आतापर्यंत हा दर ५.५ टक्के होता. अशा प्रकारे, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत व्याजदर ०.३ टक्क्यांनी वाढेल. त्याच वेळी, ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर आता ७.६ टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेवर आतापर्यंत ७.४ टक्के व्याज दिले जात आहे.
किसान विकास पत्रावरील व्याज आता ७.० टक्के
किसान विकास पत्राबद्दल सांगायचे झाल्यास, सरकारने त्याचा कार्यकाळ आणि व्याजदर दोन्हींमध्ये बदल केला आहे. किसान विकास पत्रावरील व्याज आता ७.० टक्के असेल. हा दरपूर्वी ६.९ टक्के इतका होता. त्याच वेळी, तो आता १२४ महिन्यांऐवजी १२३ महिन्यांत मॅच्युअर होईल.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात १.४ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बँका ठेवींवरील व्याजदरात वाढ करत आहेत. बँकांनी गेल्या काही महिन्यांत एफडीवरील व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. सध्या RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत व्याजदरात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. RBRI व्याजदर ०.५० टक्क्यांपर्यंत वाढवू शकते असा अंदाज आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"