Join us

मोदी सरकारचा आता शेअर मार्केटच्या कमाईवर डोळा! गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 3:00 PM

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामु‌ळे केंद्र सरकारच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या महसुलात घट झाल्याचे सांगितले जात आहे. जीएसटी उत्पन्नात वाढ होत असली, तरी महसुली उत्पन्नही वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यातच आता केंद्र सरकार शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या नफ्यासंदर्भात नवीन नियम आणण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. सरकार महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी भांडवली नफा कराच्या तरतुदींमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारातील कमाईवर कर आकारण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालय या संदर्भात विचार करीत असल्याचेही म्हटले जात आहे. अर्थ मंत्रालयासमोर ठेवलेल्या एका प्रस्तावामध्ये शेअर बाजारातून होणारी कमाई थेट प्राप्तीमध्ये मोडत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेअर बाजारातील कमाईवर आकारण्यात येणाऱ्या कराचा दर व्यवसायावर आकारण्यात येणाऱ्या प्राप्तिकराच्या तुलनेत कमी नसावा, अशी शिफारसही करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामु‌ळे केंद्र सरकारच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत असून, शेअर बाजारातील उत्पन्नावर करआकारणी त्याचाच एक भाग असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. 

रोजगाराचीही निर्मिती 

व्यवसायातून मिळणारी प्राप्ती किंवा उत्पन्नामध्ये अनेक धोक्यांचा समावेश असतो; शिवाय त्यातून रोजगाराचीही निर्मिती होत असते. भांडवली लाभ कराच्या संदर्भातील करामध्ये बदल करण्यासाठी केंद्राला कायद्यामध्ये बदल करावा लागणार आहे. अर्थ मंत्रालय याविषयी गांभीर्यपूर्वक विचार करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नोंदणीकृत इक्विटीवर एका वर्षात एक लाख रुपयांपेक्षा अधिक नफा झाल्यास १० टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कराची आकारणी केली जाते. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी समभागांवर १५ टक्के अल्पकालीन भांडवली नफा कराची आकारणी केली जाते. या नियमाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१९पासून अमलात आली आहे. 

टॅग्स :करकेंद्र सरकारशेअर बाजार