नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकारने या निर्णयाची घोषणा केल्यानंतर देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढू शकतो, असे सांगितले जात आहे. मार्चअखेरीपर्यंत महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
महागाई भत्त्यात वाढ झाल्याचा ४८ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना फायदा मिळणार आहे. यापूर्वी २०२२ च्या अर्थसंकल्पात याची घोषणा होण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. आता आगामी निवडणुकीपूर्वी सरकार त्याची घोषणा करू शकते, अशी अपेक्षा आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत, जर CPIIW चा आकडा १२५ असेल, तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या एकूण महागाई भत्ता (DA) ३१ टक्के आहे, जो ३४ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता
केंद्र सरकार महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करू शकते. महागाई भत्ता ३४ टक्के केला, तर पगारात २० हजार रुपयांची वाढ होऊ शकते. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए मूळ वेतनाच्या आधारे मोजला जातो. ऑक्टोबरमध्ये ३ टक्के आणि जुलैमध्ये ११ टक्क्यांच्या वाढीनंतर सध्याचा डीए दर ३१ टक्के आहे. भत्त्यांमध्ये ३ टक्के वाढ झाल्यानंतर १८ हजार रुपयांच्या मूळ वेतनावरील डीए ७३,४४० रुपये प्रतिवर्ष होईल.
दरम्यान, कर्मचार्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला, तर डीए ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के होईल. म्हणजेच पगार २०,८४८, ७३४४० आणि २३२१५२ रुपयांपर्यंत वाढू शकतो. प्रत्येक स्तरानुसार कर्मचाऱ्यांच्या पगार आणि डीएमध्ये वेगळी वाढ होणार आहे. जर डीए ३३ टक्के झाला आणि मूळ वेतन १८ हजार रुपये असेल, तर कर्मचार्यांचा डीए ५,९४० रुपयांनी वाढेल आणि टीए-एचआरए जोडल्यास पगार वाढून ३१,१३६ रुपये होईल. जर डीए ३४ टक्के असेल, तर १८ हजार रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा डीए वार्षिक ६,४८० रुपये आणि ५६ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक डीए २०,४८४ रुपये होईल.