Join us

वंदे भारत, राजधानीने नाही, ‘या’ एका डब्याने करुन दाखवले; रेल्वेची झाली २२ कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 8:18 PM

Indian Railways Vistadome Coaches: या सेवेला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, रेल्वेची कोट्यवधींची कमाई झाली आहे.

Indian Railways Vistadome Coaches: आताच्या घडीला देशभरात राजधानीपासून ते वंदे भारतपर्यंत आणि अंत्योदयपासून ते हमसफर एक्स्प्रेसपर्यंत विविध प्रकारच्या सेवा प्रवाशांसाठी अविरतपणे सुरू आहेत. भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी दररोज १० हजाराहून अधिक प्रवासी ट्रेनचे संचलन करते. या ट्रेनमधून दररोज सरासरी २ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात. अशा काही ट्रेन आहेत ज्यांचा उपयोग प्रवासी केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करत नाहीत, तर त्या प्रवासाचा आनंद आणि एक वेगळा अनुभव घेण्यासाठीही करतात.

मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांचे चित्तथरारक दृश्य असो किंवा मुंबई-पुणे मार्गावरील सह्याद्री पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य असो, रुंद खिडक्या आणि चकचकीत टॉप असलेले विशेष डबे प्रवाशांच्या अधिकाधिक पसंतीस पडत आहेत. हे विशेष डबे म्हणजे व्हिस्टाडोम कोच. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम कोचमध्ये १,४७,४२९ प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे रेल्वेला २१.९५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

कोणत्या ट्रेननी करून दिली कोट्यवधींची कमाई?

मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ९९.५० टक्के म्हणजेच २६,२६९ प्रवाशांसह आघाडीवर आहे. मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस ९९.१७ टक्के म्हणजेच २६,१८३ प्रवाशांसह आघाडीवर आहे. मुंबई-मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ९७.१३ टक्के म्हणजेच २५,६४४ प्रवासी, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन ९४.८ टक्के म्हणजेच २५,०३० प्रवासी, मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस ९१.०२ टक्के म्हणजेच २४,०३१ प्रवासी आणि पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस ७६.७८ टक्के म्हणजेच २०,२७२ प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोच सुविधेचा लाभ घेतला आहे. 

दरम्यान, मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस १८ कोटींच्या कमाईसह आघाडीवर आहे. मुंबई-मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसने ५.१४ कोटींची कमाई केली आहे. पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस ४.१६ कोटी, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन २.२९ कोटी रुपयांसह प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस यांनीही कोट्यवधी रुपयांची कमाई रेल्वेला करून दिली आहे. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये प्रथम व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यानंतर तेजस एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम डबे जोडण्यात आले. 

टॅग्स :भारतीय रेल्वेमध्य रेल्वे